अलंकापुरी अडकली वाहनकोंडीच्या विळख्यात
By admin | Published: April 26, 2017 03:00 AM2017-04-26T03:00:15+5:302017-04-26T03:00:15+5:30
कोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून
भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगाव
कोट्यवधींचा विकासआराखडा मंजूर असूनही अपुऱ्या आणि अरुंद रस्त्यांमुळे अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसून, दिवसेंदिवस शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ‘ब्रेक’ लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होत आहे. यामुळे समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहे.
श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज अलंकापुरीत येत असतात. याबरोबर चाकण औद्योगिक वसाहतीमधील सामानाची ने-आण मोठ्या प्रमाणात अलंकापुरीतूनच होत असते. यामुळे शहरातील रस्ते कायम गजबजलेले असतात. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागने नित्याचीच बाब झाली आहे. तासन्तास ही कोंडी सोडविणे वाहतूक कर्मचाऱ्यांनाही अशक्यप्राय होऊन जाते. यामुळे वाहने एकाच ठिकाणी खोळंबलेली असतात. सायंकाळच्या वेळी भररस्त्यात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे.
सध्या विवाह समारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने आळंदी नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह समारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात; मात्र अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करीत इच्छितस्थळी पोहोचावे लागत असल्याने अपघातजन्य परिस्थिती समोर उभी राहिली जात आहे.
आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे वडगाव, चाकण, मरकळ बाजूकडून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना अधिक अडचण निर्माण होत आहे. चाकण औद्योगिक वसाहतीकडून आळंदीमार्गे पुणे-नगर मार्गाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्या जात आहेत.