खासगी रुग्णालयांमधील धर्मादायच्या सर्व बेडस् कोविडसाठी ताब्यात घ्याव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:23 PM2020-05-28T20:23:41+5:302020-05-28T20:24:33+5:30
पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असून पालिकेच्या दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांमधील खाटाही फुल्ल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने खासगी रुग्णालयांमधील धर्मादाय म्हणून आरक्षित असलेल्या २५ टक्के बेडस् ताब्यात घेण्याची मागणी महापालिकेने केली आहे. तसे पत्रच महापालिकेने धर्मादाय आयुक्तांना दिले आहे.
शहरातील रुग्णसंख्या सहा हजारांच्या जवळपास गेली आहे. यातील तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरीही गेले आहेत. परंतु, महापालिकेने स्वाब तपासणीचे प्रमाण वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. विशेषत: कंटेन्मेंट एरियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिकेने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांसोबत करार करून तेथे कोरोना उपचारांची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. तरीही अनेकदा रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते.
काही रुग्णालयांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी करून त्याच्या रुग्णालयातील २५ टक्के खाटा धमार्दाय म्हणून आरक्षित ठेवण्याचे मान्य केलेले आहे. या रुग्णालयांना त्याचा फायदा सुद्धा मिळतो. या खाटा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार करता येतील असे महापालिकेचे म्हणणे आहे. आगामी काळात या खाटांची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे या खाटा ताब्यात घेऊन त्याचा वापर कोरोनासाठी करण्याबाबत पालिकेने धमार्दाय आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी धमार्दाय आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी सांगितले.
-----------
पालिकेने धर्मादाय आयुक्तांना खासगी रुग्णालयातील म्हणून धर्मादाय आरक्षित असलेल्या २५ टक्के खाटा ताब्यात घेऊन त्याचा वापर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारांसाठी केला जाऊ शकतो असे पत्र दिले आहे. त्याचा रुग्णांना फायदा मिळेल. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त (ज.) पुणे महापालिका