Maharashtra election 2019 :सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली ; राज ठाकरेंनी पुन्हा छेडला परप्रांतियांचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 08:38 PM2019-10-18T20:38:05+5:302019-10-18T20:42:29+5:30
महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला.
पुणे : महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. पुण्यातील कोथरूड येथील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की , आपण घरातून उतरल्यावर चांगल्या ठिकाणी राहतो असे वाटायला हवे. सध्या मात्र सर्व शहरांमध्ये बजबजपुरी आहे. ग्रामीण भागातला तरुण शहरात येत असेल तर तो त्याचा हक्क आहे, कारण तो महाराष्ट्राचा नागरिक आहे. मात्र बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. याशिवाय पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर घुसखोरी करत आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची राज्य सरकारची इच्छा नाही.
यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले इंटरनॅशनल बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे काढून टाकत आहेत. आज आमचा हा महापुरुष नसता तर आपण कुठे असतो. जर शिवछत्रपती, संभाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास सांगितला नाही तर पुढील पिढीला काय देणार आहोत. भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्याला नाही असा इतिहास महाराष्ट्राला आहे. या इतिहासाचं सरकार काय करत आहे तर किल्ल्यांवर लग्न, समारंभांना परवानगी देत आहेत. असे निर्णय म्हणजे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे.
- २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे.
- पुण्याचे खासदार ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?
-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात.
-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कधी बोलणार?
-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.
- आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच तर टाचणी लावायला मी आहेच.