अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:21+5:302021-04-10T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात शुक्रवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत कडक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात शुक्रवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. महापालिका हददीमध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहे. या काळात लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू आहेत. एखादा नागरिक अपवादात्मक स्थितीतच घराबाहेर पडू शकेल. याकरिता शहरातील विविध ९६ ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला असून, ठिकठिकाणी गस्त असणार आहे. एखाद्या नागरिकाला पोलिसांनी हटकले, तर कृपया कुणीही ते वैयक्तिक पातळीवर घेऊ नये. हे तुमच्या हितासाठी असणार आहे. घराबाहेर पडायचे झाल्यास आवश्यक ती कागदपत्रे जवळ ठेवावीत. जनतेने प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला शुक्रवारपासून ते सोमवारपर्यंत विकेंड लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जनतेचा उद्रेक होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती देताना डॉ. शिसवे म्हणाले, गुरूवारी (दि.८) महापालिका हददीत कोरोना रूग्णांची संख्या ७०५१ इतकी होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत ही संख्या जवळपास तिप्पट आहे. ही कोरोनाची वाढती संख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्याकरिता निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत पुणे शहरात १२ पोलीस कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस दलातील एकूण ४०० कर्मचा-यांना जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये पोलीस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावणार आहेत. त्यामुळे जनतेची देखील जबाबदारी आहे की त्यांनी नियमांचे पालन करावे. जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे.
--------------------
घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये वृत्तपत्र वितरणाचा देखील समावेश आहे. वृत्तपत्र विक्रेते घरोघरी जाऊन वृत्तपत्रांचे वितरण करू शकतील. त्याकरिता त्यांनी आयकार्ड जवळ बाळगावे. मात्र रस्त्यांवर वृत्तपत्रांचे स्टॉल्स उभारण्यास मनाई आहे.
- डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त
---------------------