मुंबई महापालिकेचा कारभार लपविण्यासाठीच सर्व खटाटोप : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:47+5:302021-02-09T04:12:47+5:30
पुणे : कोरोनाकाळात मुंबई महापालिकेने केलेला कारभार उजेडात येऊ नये, म्हणूनच कोरोना आपत्तीचा दाखला देत, राज्याच्या नगरविकास खात्याने सर्व ...
पुणे : कोरोनाकाळात मुंबई महापालिकेने केलेला कारभार उजेडात येऊ नये, म्हणूनच कोरोना आपत्तीचा दाखला देत, राज्याच्या नगरविकास खात्याने सर्व महापालिकांना सर्वसाधारण सभा घेण्यास मनाई केली आहे़ केवळ मुंबई महापालिकेचा कारभार लपविण्यासाठी राज्यातील इतर महापालिकांना राज्य सरकारकडून वेठीस धरण्यात आले आहे़, असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केला़
मोहोळ म्हणाले, कोरोना आपत्तीमुळे २७ मार्च २०२० रोजी राज्य शासनाने राज्यातील महापालिकांनी सर्वसाधारण सभा घेऊ नये, असे आदेश काढले़ कोरोना आपत्तीचा प्रभाव कमी झाल्यावर पुण्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी आम्ही राज्य सरकारकडे मागितली़ परंतु, या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी कधीच याबाबत आम्हाला सहकार्य केले नाही़
आज शहराकरिता आवश्यक असलेली कामे मार्गी लावण्याकरिता आम्ही राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे ऑनलाईन सभेचे आठवड्यापूर्वीच नियोजन तेही विरोधी पक्षांशी बोलूनच केले होते़ पण विरोधी पक्षांनी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी महापौर दालनात आज जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा असून, ती केवळ स्टंटबाजी असल्याची टीका मोहोळ यांनी केली़
---------------
केवळ पुण्यापुरतेच आदेश कसे
महापालिकेची सर्वसाधारण सभा ८ फेब्रुवारी रोजी घेण्याबाबतचे आदेश रविवारी प्राप्त झाले़ पण हे आदेश एका दिवसासाठीचे असून, ते नगरविकास खात्याचे नव्हे, तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आहेत़ राज्य सरकारला प्रत्यक्ष सभा घेण्याची परवानगी द्यायची होती, तर ती केवळ पुण्यापुरतीच का मर्यादित ठेवली़ राज्यातील सर्व महापालिकांसाठी असे आदेश का काढले नाहीत, असा प्रश्न या वेळी महापौर मोहोळ यांनी उपस्थित केला़
या वेळी सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
---------------------------------------