पुणे शहरासह जिल्ह्यातील संचारबंदीच्या काळातील सर्व आपत्कालीन व्यवस्था सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 08:20 PM2020-03-23T20:20:28+5:302020-03-23T20:26:33+5:30
मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली संचारबंदी लागू
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरासह जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस दलासह अग्निशामक दल नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली असून, खासगी वाहतूक, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात जर कोणाला वैयक्तिक स्वरूपाची किंवा वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्याकरिता सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून, रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. प्रशासनाने पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती निवारण व्यवस्थापन, रुग्णवाहिका, रुग्णालयांचे डॉक्टर्स, पॅरा मेडिकल कर्मचारी यांना जमावबंदी आणि संचारबंदीच्या आदेशामधून वगळलेले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आगीच्या तीन ते चार घटना शहरात घडल्या आहेत. यासोबतच आजारी व्यक्ती किंवा नागरिकांना अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांच्यावेळी वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकणार आहे. नागरिकांनी त्याची काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवश्यकता असल्यास किंवा कोणती अडचण निर्माण झाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. यासोबतच आपापल्या भागात रुग्णवाहिकांची सेवा देणारी गणेश मंडळे, संस्था यांच्यासोबतही नागरिक संपर्क साधू शकतील.
=====
महापालिकेने शहरात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा सुरू आहेत. यासोबतच सर्व दवाखाने आणि रुग्णालयेही सुरु राहणार आहेत. कोणाला वैद्यकीय अडचण असल्यास किंवा कोठून मदत उपलब्ध न झाल्यास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेची मदत नागरिक घेऊ शकतात. - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
=====
आपत्कालीन परिस्थितीत येथे साधा संपर्क :-
आगीच्या घटना १०१
वैद्यकीय मदत १०८
महापालिका आपत्कालीन सेवा ०२०-२५५०६८००/१/२/३
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट २४४७९२२२, २४४८१४७२