नगरसेवक की पुण्याचे जावई..?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:36 AM2019-06-18T11:36:36+5:302019-06-18T11:42:20+5:30
सुरुवातीला केवळ माजी नगरसेवकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर यामध्ये माजी नगरसेवकांची पत्नीचा सहभाग करण्यात आला.
पुणे : महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी महापालिकेत अंशदाय वैद्यकीय सहाय्य योजना सुरु करण्यात आली. सुरुवातीला केवळ माजी नगरसेवकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर यामध्ये माजी नगरसेवकांची पत्नीचा सहभाग करण्यात आला. हे ही कमी की काय म्हणून आता माजी नगरसेवक आणि त्याची पत्नी यात त्याची दोन मुले आणि आई-वडिलांचीही भर टाकण्यात आली आहे.
माजी नगरसेवकाच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ देण्यास सोमवारी (दि. १७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाचा बोजा आता करदात्या पुणेकरांच्या माथी मारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरसेवक संजय भोसले आणि विशाल धनवडे यांनी दिलेल्या पत्रानुसार, महापालिकेतील सर्व माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सुरु करण्यात आली. यात सुरुवातीला केवळ माजी नगरसेवक आणि त्याच्या पत्नीचा समावेश केला गेला. यात प्रशसनानेच बदल करत माजी नगरसेवकांची दोन मुले आणि आई-वडिलांचा समावेश करण्याचा ठराव दिला. महापालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयांमध्ये ‘सेमी प्र्रायव्हेट वॉर्ड’ची (अंशत: खासगी खोली) सुविधा उपलब्ध करुन देण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, उमेश गायकवाड, दिपक पोटे, प्रकाश ढोरे, हेमाली कांबळे, दिलीप वेडे-पाटील (भाजपा), महेंद्र पठारे, अशोक कांबळे (राष्ट्रवादी) यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
----------------
दोन वर्षांत २ कोटी ४२ लाखांचा खर्च
माजी नगरसेवक व त्यांच्या पत्नी यांच्या आरोग्यावर गेल्या दोन वर्षांत तब्बल २ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षी २२७ माजी नगरसेवक व १२५ माजी नगरसेवक पत्नी अशा एकूण ३५२ व्यक्तींवर १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात झाला. त्यानंतर सन २०१८-१९ मध्ये माजी नगरेसवक व त्यांच्या पत्नी अशा एकूण ३७१ व्यक्तींच्या आरोग्यावर १ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाले. आता माजी नगरेसवकांचे आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश झाल्यास हा खर्च काही पटींनी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.