पुणे विभागातले पाचही जिल्हे यंदा पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:32+5:302020-12-12T04:28:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पाऊस चांगला झाल्याने यंदा पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्याकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पाऊस चांगला झाल्याने यंदा पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्याकडे यंदा दुष्काळ फिरकणारही नाही. या सर्व जिल्ह्यांमधील एखादा अपवाद वगळता सर्व तालुक्यांमधील भूजल पातळीत मागील ५ वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जमिनीच्या पृष्ठभागापासून खाली कमीतकमी खोलीवर पाणी मिळण्याचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे.
या सर्व जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यात एकापेक्षा जास्त निरीक्षण विहिरींची पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून एकूण १९२ निरीक्षण विहिरींची पाहणी करण्यात आली. या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सातारा जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये १०६ विहिरींची पातळी मोजण्यात आली. याही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला आहे.
सांगली जिल्ह्यात ८६ विहिरींची तपासणी झाली. या जिल्ह्यातील जत हा तालुका वगळता अन्य सर्व म्हणजे मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव शिराळा या भागात पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोलापूर ११ व कोल्हापूरमधील १२ तालुक्यांमध्ये अनुक्रमे १६५ व ९९ निरिक्षण विहिरींची पातळी तपासण्यात आली. मागील ५ वर्षांच्या सरासरीपेक्षा प्रत्येक तालुक्यात ०.२ मीटरपासून ते दोन मीटरपर्यंत भूजलपातळी वाढली आहे.
मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदा पर्जन्यमान चांगले झाले. जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण त्यामुळे वाढले. त्याचा परिमाण भूजल पातळीवर झाला आहे. टंचाई आराखडा तयार करण्यासाठी या निष्कर्षांचा वापर केला जातो. तसेच पाणी पातळीत घट झाली सरकारला वेगवेगळ्या उपाययोजना करणेही या अहवालाचा उपयोग होतो.