अख्खं आयुष्य सरलं; पण डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:28 PM2019-05-13T13:28:53+5:302019-05-13T13:44:57+5:30

सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास...

'All life is going ; But water problem not solved | अख्खं आयुष्य सरलं; पण डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय!

अख्खं आयुष्य सरलं; पण डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय!

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी भगिनींच्या व्यथा : गावात मुली देण्यासही तयार नाही

संतोष जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : ‘‘अख्खं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय! सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा किव येणार अन् आमच्या डोईवरचा हंडा कव्हा खाली येणार? मुलकातल्या पोरी आमच्या गावाली द्यायचं म्हटलं तर पोरीचा बा म्हणतो ‘नको गड्या पक्की पाण्याची टिपावं (दुष्काळ) हाय, तुमच्या मुलकाली त्या गावाली माया पोरीचा आख्खं आयुष्यभर पाणी भरता भरता जायचं’, आमच्या गावाली पोरी द्यायला कोणी धजत नाही,’’ हे शब्द आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांमध्ये  राहणाऱ्या आदिवासी महिला रखमाबाई वाजे यांचे.

आदिवासी भागात असलेले कोंढवळ हे गाव वन विभागाच्या खोडा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने व भौतिक सेवा-सुविधांच्या अभावाने आबाळलेलेच. सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास. भीमाशंकर अभयारण्यात वसलेल्या या गावाला एकदा का उन्हाळ्याची चाहूल लागली की या गावातील आदिवासी बांधवांना दुष्काळाशी सामना करावा लागतो.  या पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगर दऱ्याखोऱ्यातून खडतर पायपीट करावी लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये हजार ते दीड हजार फूट दरीमध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये कोंढवळ हे गाव वसलेले आहे. जवळच असलेल्या शिंदेवाडी, गवांदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी, केवाळवाडी या वाड्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र घालवावी लागत आहे. संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यासाठी एक कूपनलिका ती ही आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पुन्हा अडीचशे ते तीनशे फूट खाली खोल दरीत उतरून पुन्हा तेवढेच वर चढून चोंडीच्या झऱ्याच्या धबधब्यावरून हंडा वर काढताना यातना सहन कराव्या लागत आहेत.

एकीकडे घोटभर पाणी प्यायला नाही मिळाल्यावर मरण तर दुसरीकडे पाणी आणताना दरीत पाय घसरून पडले तर मरण, आम्ही जीवन जगायचे तरी कसे, या वयाला वयात आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे लोटली? आम्ही पारतंत्र्यातच आहोत.

- साळीबाई दाते, ग्रामस्थ 
  

Web Title: 'All life is going ; But water problem not solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.