राज्यातील सर्व महापालिका लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:53+5:302021-09-03T04:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “दिल्लीतील कामांमुळे आम आदमी पार्टीची (आप) ओळख काम करणारा पक्ष अशी झाली आहे, त्यामुळेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “दिल्लीतील कामांमुळे आम आदमी पार्टीची (आप) ओळख काम करणारा पक्ष अशी झाली आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांची निवडणूक आम्ही लढवणार आहोत,” अशी घोषणा आपने गुरुवारी (दि. २) पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आपच्या प्रदेश कार्यकारिणीने भेट दिली. प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, किशार मध्यान, धनंजय शिंदे, विजय कुंभार, पुण्याचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत या वेळी उपस्थित होते. दिल्लीत आपची सत्ता आहे. पंजाबात प्रमुख विरोधी पक्ष आहोत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये आघाडीवर आहोत. महाराष्ट्रात काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवले. त्यामुळेच आता राज्यात सर्व महापालिका लढवणार असल्याचे आप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“दिल्लीत घडू शकते तर महाराष्ट्रात का नाही असेच आता जनतेला वाटते आहे. त्याचाच आपला उपयोग होईल. सत्ता स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी हाच आपचा विचार आहे व तो लोकांना पसंत पडतो,” असा दावा आपने केला. “भ्रष्टाचार हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल. पुण्यात, पिंपरीत झाले ते लांच्छनास्पद आहे. दिल्लीत आम्ही वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधांवर भर दिला. भ्रष्टाचार झाला नाही तर त्याचे दर कमी करता येतात हे आपने दिल्लीत सिद्ध करून दाखवले” असे राचूरे म्हणाले. श्रीकांत आचार्य, डॉ. संदीप सोनवणे, सुभाष करांडे आदी यावेळी उपस्थित होते.