नोटाबंदीविरोधात सर्व संघटना येणार एकत्र; ७, ८ नोव्हेंबरला पुण्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:26 PM2017-11-02T15:26:48+5:302017-11-02T15:28:03+5:30
येत्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पुण्यात नोटांबंदीचा निषेध करण्यासाठी नागरी सभा आणि ‘नोटबंदीका जबाब दो’ हे आंदोलन केले जाणार आहे.
पुणे : नोटाबंदीची घोषणा करताना दिलेले एकही आश्वासन मोदी सरकारने एक वर्ष उलटूनही पाळले नाही. या वास्तवाची जाणीव झालेले नागरिक, कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे ठरविले आहे. येत्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पुण्यात नोटांबंदीचा निषेध करण्यासाठी नागरी सभा आणि ‘नोटबंदीका जबाब दो’ हे आंदोलन केले जाणार आहे.
ही माहिती नोटांबंदी निषेध पुणे या समूहाचे प्रवर्तक विश्वभर चौधरी आणि सहयोग ट्रस्टचे अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुभाष वारे, युकांद्रचे डॉ संदीप बर्वे, लेखक संजय सोनावणी उपस्थित होते.
मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी ‘नोटबंदीका जबाब दो’ याविषयावर सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे नागरी सभा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ अभय टिळक, साम्यवादी नेते अजित अभ्यंकर आणि विश्वमभर चौधरी आपले विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर रात्री ८ वाजता नोटांबंदीमुळे निधन पावलेल्या १२० नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली दिली जाणार आहे.
बुधवार दि. ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विजय टॉकीज गेटजवळ मानवी साखळीद्वारे आंदोलन केले जाईल.