अन्य सर्व दुकाने सुरू करण्यास तातडीने परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:12+5:302021-04-07T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या आदेशानुसार अत्यावशक सेवा व संबंधित दुकाने सोडून इतर सर्व दुकाने (दि. 30) रोजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या आदेशानुसार अत्यावशक सेवा व संबंधित दुकाने सोडून इतर सर्व दुकाने (दि. 30) रोजी पर्यंत बंद राहतील, असे महाराष्ट्र शासनाकडून आदेश कडून तत्काळ अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. पूर्णतः दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयात सुधारणा करून कडक निर्बंधांसह व कोव्हीड च्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी लेखी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन दिले आहे.
ज्याप्रकारे मागील एक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने ठाकरे यांच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या विरुद्ध धैर्याने लढा दिला आहे. आजही पूर्ण ताकतीने सामना करीत आहेत. सरकारचे फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या वतीने कौतुक केले आहे. याबाबत माहिती देताना संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी पूर्ण लॉकडाऊन च्या करण्याच्या विरोधात आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तर व्यापार पूर्णतः कोसळल्या शिवाय राहणार नाही. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. नवीन महामारी होती. आजाराबाबत, त्याच्या परिणामांबाबत माहिती नव्हती. त्यावेळी लॉकडाऊन केला. त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान व्यापाऱ्यांना झाले तरीही महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी पूर्णतः सहकार्य केले होते. आत्ता कुठे व्यापार हळू हळू पूर्वपदावर येऊ लागला होता. झालेल्या नुकसानीतून व्यापारी कसाबसा सावरत होता. त्यात पुन्हा लॉकडाऊन लावला तर व्यापार क्षेत्र पांगळ्या गत होईल. तर दुसरीकडे आत्ताची परिस्थिती मागील वर्षीच्या तुलनेत वेगळी आहे. कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर आहे. परंतू आज आपल्याकडे दोन लसी आहेत. मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या होत आहेत, डॉक्टरांना उपचाराचे कौशल्य आलेले आहे. ह्या आपल्या जमेच्या बाजू आहेत.
म्हणून वरील निवेदनात पूर्ण लॉकडाऊनऐवजी, ५०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सर्व दुकाने, कार्यालये व आस्थापना मर्यादित वेळेसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी कोरोना विषयक शासनाचे सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करतील, असेही फामचे उपाध्यक्ष राजेश शहा यांनी सांगितले.