चिऊताईला जपण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज : अन्यथा चिऊताई लोप पावेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:28+5:302021-03-20T04:10:28+5:30
-- खोडद : अनेक पिढ्यांनी ऐकलेल्या कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताई ही साऱ्यांची लाडकी. मात्र तिचे प्रमाण दिवसेंदिवस कमी ...
--
खोडद : अनेक पिढ्यांनी ऐकलेल्या कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताई ही साऱ्यांची लाडकी. मात्र तिचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असून आपल्या या लाडक्या चिऊताईला जपण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. अन्यथा चिमणी ही केवळ चित्रात दाखविण्यपुरती उरेल.
चिमणी वाचविण्यासाठी दरवर्षी २० मार्च हा जगभरात 'चिमणी दिन' म्हणून साजरा केला जातो. चिऊताईचे संवर्धन करण्यासाठी खऱ्या अर्थाने चिमण्यांचा अधिवास जपण्याची गरज आहे. चिऊताई संपली तर आपल्याला संपायला फार वेळ लागणार नाही.
१९५८ मध्ये चीन मध्ये मच्छर,माशी,उंदीर आणि चिमण्या मारायची मोहीम हाती घेण्यात आली. मच्छर मुळे मलेरिया, माशी मुळे कॉलरा, उंदरांमुळे प्लेग होतो आणि चिमण्या अन्नधान्याचा साठा कमी करतात. म्हणून या चौघांना मारण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. मच्छर, माशी आणि उंदीर हे चपळ असल्याने त्यांनी त्यांचा जीव वाचविला. चिमण्या मात्र स्वतःला वाचवू शकल्या नाहीत. जो अधिक चिमण्या मरेल त्याला बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले. नागरिक लोखंडी भांडी, लोखंडी पत्रे वाजवून चिमण्यांना झाडावर बसू दिले नाही. चिमण्यांची अंडी फोडली जायची तर घरटी पेटवून दिली जायची. आता रस्त्यावर चिमण्यांचे खच पडू लागले. चिमण्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाली,नव्हे तर चीन मधील चिमण्या नामशेष झाल्या.
१९६० मध्ये पिकांवरील कीटकांचा प्रादुर्भाव एवढा वाढला की अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. अन्नधान्याचा तुटवडा झाल्याने भूकबळी, कुपोषण यामुळे चीनमधील दोन कोटी पन्नास लाख नागरिकांचा मृत्यू झाला. मूठभर धान्य खाणारी चिमणी पोतं भरून धान्य वाचवते हे चीनच्या लक्षात आल्यानंतर त्यांना दुसऱ्या राष्ट्रातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.
कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार केरळ, गुजरात व राजस्थान मध्ये चिमण्यांचे प्रमाण २० टक्के,आंध्र व तेलंगाणा मध्ये ८० टक्के किनारपट्टीच्या भागात ७० ते ८० टक्के खाली आले आहे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नधान्यावरील कीटकांचे प्रमाण कमी झाल्याने चिमण्यांना त्यांचे अन्न मिळत नाही.
--
कोट १
पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्यांचे प्रमाण कमी होणे हा गंभीर प्रश्न आहे.चिऊताईसाठी घराबाहेर 'मूठभर धान्य व वाटीभर पाणी' हा उपक्रम प्रत्येकाने राबवायला हवा,जेणेकरून चिमण्यांचा धान्य व पाण्याअभावी मृत्यू होणार नाही." - उत्तम सदाकाळ, पक्षी व निसर्ग अभ्यासक,
--
फोटो १९ खोडद चिउताई