पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:27 AM2018-02-24T02:27:20+5:302018-02-24T02:27:20+5:30
उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास
पुणे : उन्हाळ्याची सुरुवात झाली असतानाच उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू झाली आहे. उपनगरांमधील नागरिकांना प्रामुख्याने त्रास होत असून तेथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याविरोधात शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत आक्रमक धोरण स्वीकारत प्रशासनावर टीका केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी त्यांना उत्तरे देत समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
महापौर मुक्ता टिळक यांनी सभेचे कामकाज सुरू करताच पाण्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांनी टीका सुरू केली. शहरात कुठे ८ तास, तर कुठे पाणीच येत नसल्याची ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. धानोरी, नगररोड, लोहगाव, हडपसर, कात्रज, कोथरूड भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
हडपसर परिसरात असमान पाणीपुरवठा होत आहे. आयुक्तांनी पाचवा पंप सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रमोद भानगिरे यांनी दिला. प्राची आल्हाट यांनी प्रशासन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नसल्याची टीका केली.
हांडेवाडी, महंमदवाडी परिसरात केवळ १० ते १५ मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. भाजपाच्या संजय घुले यांनी आपणही सध्याच्या विरोधकांनी केला त्याचप्रमाणे कारभार करतो आहोत, असे म्हणत सत्ताधाºयांना घरचा अहेर दिला.
कोथरूड गावठाणात चढउतारामुळे पाणी येत नसल्याचे थातूरमातूर उत्तर अधिकारी देत असल्याचे नगरसेविका हर्षाली माथवड यांनी सांगितले. दरवर्षी पाण्यावर चर्चा होते.
पाणी साठवण टाकीसाठी खासगी जागामालक जागा द्यायला तयार आहे. गेली अनेक वर्षे त्यासाठी प्रयत्न करतो आहे, मात्र प्रशासनाला हे काम करायचेच नाही, असे वसंत मोरे यांनी सांगितले.