भाजपावर सर्वपक्षीय हल्लाबोल

By admin | Published: August 23, 2016 01:12 AM2016-08-23T01:12:44+5:302016-08-23T01:12:44+5:30

दीड वर्ष प्रलंबित असलेल्या विकास आराखड्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीयांनी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडले.

All-party attack on BJP | भाजपावर सर्वपक्षीय हल्लाबोल

भाजपावर सर्वपक्षीय हल्लाबोल

Next


पुणे : राज्य सरकारकडे तब्बल दीड वर्ष प्रलंबित असलेल्या विकास आराखड्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीयांनी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडले. या विषयावर चर्चा होऊच शकत नाही, अशी भूमिका घेऊन भाजपाने सभात्याग केला. त्यांच्या अनुपस्थितीतच सर्वपक्षीय सदस्यांनी राज्य सरकार तसेच भाजपावर टीका केली. केलेले घोटाळे उघड होतील, या भीतीनेच चर्चा करण्यास भाजपा घाबरत असल्याचा आरोप करण्यात आला.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने जाणीवपूर्वक विकास आराखड्यावरील चर्चेसाठी या विषयावर मंगळवारी खास सभेचे आयोजन केले होते. सभेच्या सुरुवातीलाच आक्रम भूमिका घेऊन भाजपाचे गटनेते गणेश बीडकर व अन्य सदस्यांनी विषय राज्य सरकारकडे असून न्यायप्रविष्टही आहे; त्यामुळे चर्चा करता येणार नाही, ही सभा बेकायदेशीर आहे, असे सांगितले. काँग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे किशोर शिंदे, शिवसेनेचे अशोक हरणावळ यांनी याला विरोध केला. चर्चा व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावरून महापौरांच्या आसनासमोर जमून भाजपाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘हिंमत असेल तर चर्चा करा, घोटाळे उघड होतील म्हणून घाबरता का?’ अशी विचारणा शिंदे, केमसे करीत होते. त्यांना बीडकर, मुक्ता टिळक, श्रीनाथ भिमाले अडवत होते. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, नगरसचिव सचिन पारखी, विधी सल्लागार रवींद्र थोरात यांनी निर्णय घेता येणार नाही; प्रश्नोत्तरे करता येणार नाहीत, असे सांगितले. त्याचाच आधार घेऊन महापौर प्रशांत जगताप यांनी चर्चा होऊ शकते, असे जाहीर केले. त्याचा निषेध करून भाजपाचे सदस्य सभागृहाबाहेर गेले.
त्यानंतर सर्वच सदस्यांनी भाजपावर हल्ला केला. मनसेचे राजेंद्र वागसकर म्हणाले, ‘‘भाजपा व राष्ट्रवादी यांच्या भांडणातून डीपीमध्ये कायकाय झाले, याचा अंदाज येत आहे. पुणेकरांच्या हितासाठी राज्य सरकारने आता लवकर निर्णय घ्यावा.’’
फक्त भाजपाच्या आमदारांना कळते म्हणून मुख्यमंत्री त्यांचाच सल्ला घेत आहे का, अशी विचारणा वसंत मोरे यांनी केली. कमल व्यवहारे यांनी राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे पेठांमधील अनेक कामांबाबत अडचण येत असल्याची तक्रार केली. सचिन भगत यांनी भाजपाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसही याला जबाबदार असल्याचा आरोप केला.
सतीश म्हस्के यांनी भाजपा सरकारचा निषेध केला. इतर पक्षांच्या आमदारांना डावलून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अपमान केला असल्याचे रूपाली पाटील म्हणाल्या. गटनेत्यांच्या भाषणानंतर हा विषय थांबविण्यात आला. (प्रतिनिधी)
>भाजपाची दुटप्पी भूमिका
सदस्यांच्या भाषणानंतर अशोक हरणावळ, किशोर शिंदे, अरविंद शिंदे, बंडू केमसे या गटनेत्यांनीही भाजपावर जोरदार हल्ला केला. विकास आराखडा पालिकेकडे होता, त्या वेळी भ्रष्टाचाराचे आरोप करीत भाजपाने पुण्यात गोंधळ घातला. आता त्यांचेच राज्य सरकार निर्णय घ्यायला विलंब करीत आहे, तर त्यांना त्यावर शब्दही बोलायचा नाही. यावरून त्यांची दुटप्पी भूमिका सर्व पुणेकरांच्या लक्षात आली आहे, अशी टीका करण्यात आली. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आराखड्यात नागरिकांचे अहित करणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, असा आरोप करण्यात आला.
>काँग्रेसमधील मतभेद या विषयामुळे पुढे आले. नगरसेवक संजय बालगुडे यांनी गटनेते अरविंद शिंदे यांच्यानंतर बोलण्याचा आग्रह धरला. असा संकेत नाही, असे सांगून महापौरांनी तर त्यांना बोलण्यास मनाई केलीच; शिवाय काँग्रेसचेच अरविंद शिंदे यांनीही ‘संकेत मोडू नका, अन्यथा मलाही सभागृह नेत्यांच्या नंतर बोलण्यास परवानगी द्या,’ अशी भूमिका घेऊन बालगुडे यांना विरोध केला.
काँग्रेसचेच दुसरे सदस्य अविनाश बागवे यांनी अहवालावर चर्चा न करता विकास आराखड्यावर वांझोटी चर्चा करण्यात रस नाही, असे सांगून सभात्याग केला.
विकास आराखड्यावरून भाजपावर केलेल्या हल्ल्याने समाधान न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सभेच्या तहकुबीसाठीही भाजपाचेच कारण घेतले. भाजपाच्या शहराध्यक्षांनी महापौरांबाबत असंसदीय शब्दांचा वापर केला त्याचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्यात आली.

Web Title: All-party attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.