सर्वांगीण विकास करणारे शिक्षण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:14 AM2018-02-06T01:14:48+5:302018-02-06T01:14:52+5:30
लोकसंख्या वाढत असताना दर्जेदार शिक्षण मिळण्याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक विकास करणारे संस्कारक्षम शिक्षण मिळाले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
पुणे : लोकसंख्या वाढत असताना दर्जेदार शिक्षण मिळण्याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक विकास करणारे संस्कारक्षम शिक्षण मिळाले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळींच्या १३० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी एस. पी. एम. पब्लिक स्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या टेबल टेनिस हॉलचे उद्घाटनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, विश्वस्त अशोक वझे, आमदार माधुरी मिसाळ, जयंत किराड, सतीश पवार, एस. पी. एम. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती मॉरिस आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, आज शिक्षणाचे बाजारीकरण होत चालले आहे. मात्र, हे बाजारीकरण न करता चांगल्या संस्कराचे शिक्षण देणाºया काही शिक्षणसंस्था आजही महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे नाव आदराने घ्यावे लागेल.
डॉ. करमळकर म्हणाले, नीतिमूल्ये व संस्काराची व्यवस्था ढासळत चालली आहे. पण आजही शिक्षणाचा दर्जा आणि गुणवतेला महत्त्व देणाºया जुन्या संस्था पुण्यात आहेत. या संस्थांच्या कामाची पाहणी करणे नेहमी आवडते. त्यामुळे चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.
संस्थेचे अध्यक्ष जैन यांनी भाषणात संस्थेच्या यशस्वी वाटचालीविषयी सांगितले. वझे यांनी प्रास्ताविक केले. चितळे यांनी आभार मानले.