खोदाईसाठी सर्व नियम धाब्यावर
By admin | Published: May 13, 2017 04:55 AM2017-05-13T04:55:46+5:302017-05-13T04:55:46+5:30
महापालिका प्रशासनाने एल अॅँड टी कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसविले आहे. शहरामध्ये सेवा वाहिन्या टाकण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका प्रशासनाने एल अॅँड टी कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसविले आहे. शहरामध्ये सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यास ३० एप्रिलपर्यंतच परवानगी देण्याचे महापालिकेचे धोरणच असताना या कंपनीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शहरात सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करणाऱ्या कंपन्यांना ३० एप्रिलपर्यंत परवानगी देण्याचे महापालिकेने खास
धोरण निश्चित केले आहे. परंतु, महावितरण आणि गॅस वाहिन्या टाकणाऱ्या एमएनजीएल कंपनीला अत्यावश्यक सेवा म्हणून ही खोदाई करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
याच अत्यावश्यक सेवेचे निकष स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये ‘वाय-फाय’ सुविधा पुरविण्याचे काम देण्यात आलेल्या एल अॅँड टी कंपनीच्या खोदाईसाठी लावण्यात आला आहे. शहराला ‘वाय-फाय’ सुविधा पुरवण्याचे कामदेखील अत्यावश्यक सेवा असल्याचे सांगत कंपनीलादेखील ३१ मेपर्यंत खोदाई करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या तिन्ही कंपन्या सुमारे शंभर किलोमीटरचे खोदकाम करणार असल्याचे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत मोबाईल; तसेच शासकीय कंपन्यांकडून भूमिगत सेवावाहिन्या टाकणे सुरू आहे. यासाठी तब्बल ८ महिने या कंपन्या शहरात खोदकाम करतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था होते. या बेसुमार खोदकामांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी खास खोदाई धोरण तयार केलेले आहे. यानुसार, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती आवश्यक असल्याने ३० एप्रिलपर्यंतच खोदकाम परवानगी दिली जाते. त्यानंतर संपूर्ण मेमध्ये दुरुस्ती केली जाते. त्यानंतर केवळ एखादे अत्यावश्यक काम आले, तरच खोदकामास मान्यता देण्याचे विशेष अधिकार अतिरिक्त आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना आहेत.
अत्यावश्यक सेवेतही पाणी, ड्रेनेज, तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे ३० एप्रिल रोजी पथ विभागाने संपूर्ण शहरातील खोदकाम थांबवले; मात्र महावितरण आणि एमएनजीएल या दोन कंपन्यांना अत्यावश्यक बाब म्हणून ३ मेपर्यंत खोदकामास मान्यता दिली; मात्र त्यावेळी ‘वाय-फाय’ साठी शहरात सुमारे ५२ किलोमीटरचे खोदकाम करणा-या एल अँड टीलाही अत्यावश्यक बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.