अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकानं, मॉल बंद ठेवण्यात यावीत; पुणे महापालिकेचे आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 10:19 PM2021-09-17T22:19:32+5:302021-09-17T22:19:58+5:30
आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे
पुणे : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे येत्या रविवार १९ सप्टेंबरला शहरातील सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावेत. असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत.
गणेश विसर्जनासाठी रस्त्यांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या दिवशी महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (मॉलमधील वगळून) पूर्ण दिवस चालू राहतील. हे सर्व आदेश खडकी व पुणे कॅन्टॉमेंट बोर्ड हद्दीतील दुकांनाही लागू राहणार आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी
पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयारी पूर्ण केली असून, सर्व क्षेत्रिय कार्यालय / प्रभागनिहाय गणेश मुर्ती संकलन केंद्र व फिरते विसर्जन हौद यांची व्यवस्था केली असल्याची माहिती दिली आहे. घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जनासाठी अमोनियम कार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये तसेच गणेश मुर्ती संकलन केंद्रांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक सोसायटीमधून निर्माल्य वेगळे उचलण्यासाठी सोय देखील करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी व घराजवळील व्यवस्थेसाठी नागरिकांनी़ https://pmc.gov.in/GaneshFestival_2021 या लिंकवर क्लिक करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे़