पुणे शहरातील ‘कंटेनमेंट झोन’वगळता इतर भागातील सर्व दुकाने १२ तास खुली राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:00 PM2020-05-07T13:00:15+5:302020-05-07T13:54:07+5:30
प्रत्येक दुकानामध्ये फिजिकल डिस्टसिंग पाळणे व राखणे याची जबाबदारी ही संबंधित दुकानदारांची राहणार
पुणे : पुणे शहरातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्व दुकाने बुधवारपासून सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना कोणती दुकाने कधी सुरू ठेवायची याचे वेळापत्रकही महापालिकेने जाहिर केले आहे. ही मान्यता देताना लक्ष्मी रस्त्यासह पुण्यातील मुख्य बाजारपेठ बंदच राहणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे नवे आदेश मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. यामुळे गेली कित्येक दिवस कोणती दुकाने खुली राहणार त्यांची वेळ काय याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. या आदेशानुसार, एक रस्ता किंवा गल्लीमध्ये जास्तीत जास्त पाच दुकानांनाच प्रति १ किलोमिटर प्रमाणे मुभा देण्यात आली आहे.मात्र, याठिकाणीही दुकानांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, वाराप्रमाणे दुकाने खुली करण्यास परवानगी दिली गेली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना मात्र कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. ती दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघउी राहणार असून, यामध्ये किराणा, दूध, भाजीपाला, फळे, सर्व प्रकारचे दवाखाने व औषध दुकाने यांचा समावेश आहे.
दरम्यान पुणे महापालिकेने सर्व दुकाने सुरू करण्यास जरी परवानगी दिली असली तरी, पुण्याची बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, आप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता( एम जी रोड), कोंढवा रोड, ज्योती हॉटेल ते एनआयबीएम रस्ता येथील दुकाने मात्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. परंतू येथील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
* दुकानांना परवानगी देतानाच जीवनावश्यक वस्तूंचे व औषधांचे आणि तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप करण्यास सकाळी १० ते रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
वस्तू विक्रीसाठी निश्चित केलेले दिवस व व्यवसायाचा प्रकार पुढील प्रमाणे:
* सोमवार-
इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने.
* मंगळवार-
वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने
* बुधवार-
इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने.
* गुरुवार -
वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने
* शुक्रवार-
इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने.
*शनिवार -
वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने.
* रविवार-
वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने.
नवे आदेश जारी करताना, प्रत्येक दुकानामध्ये फिजिकल डिस्टसिंग पाळणे व राखणे याची जबाबदारी ही संबंधित दुकानदारांची राहणार आहे. तसेच प्रत्येक दुकानदारांनी आपल्या कामदारांना फोटोसह ओळखपत्र देण्याबाबतही सूचना करण्यात आली आहे.