मेडिकल, दूधविक्री सोडून सर्व दुकाने आज-उद्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:30+5:302021-04-10T04:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरातही शनिवार-रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये केवळ मेडिकल व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरातही शनिवार-रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये केवळ मेडिकल व दूधविक्रीला परवानगी असून, दूधविक्रीही सकाळी ६ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता आहे. इतर अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, बेकरीसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहे.
या लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या काळात शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुविधा सुरू राहणार आहे़ पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत़ या दोन दिवसांत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात महापालिका हद्दीत सर्व प्रकारच्या आॅनलाईन सेवा पुरवठा करणाीऱ्या कंपनी (ई-कॉमर्स, स्विगी, झोमॅटो) यांना आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे शनिवार-रविवारीही प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ मात्र शुक्रवार दि. ९ एप्रिलच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवार दि.१२ एप्रिलच्या सकाळी ७ या संचारबंदीच्या काळात नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही़ मात्र हॉटेल, रेस्टॉरंट, बारद्वारे घरपोच पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे़ याचबरोबर अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपीच्या बसेस तसेच ओला, उबेर टॅक्सी वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून, एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मेसमधून डबे नेण्याची सवलत देण्यात आली आहे.
५ व ६ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या संचारबंदीच्या आदेशानुसार, सोमवारी सकाळी ७ ते शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्र आण तेथून घरी जाण्यासाठी एका पालकासह प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
यासह परवानगी देण्यात आलेल्या बाबी
* घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वंयपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस, नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत प्रवास करण्यास परवानगी राहील.
* स्पर्धा परीक्षेमुळे महापालिका क्षेत्रातील सर्व खानावळी सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेत केवळ पार्सल सेवेसाठी सुरू राहातील.
* ज्या बांधकामांच्या ठिकाणी मजुरांची राहण्याची सोय आहे, ती बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
* मद्यविक्रीच्या दुकानातून सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत होम डिलिव्हरी सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
* अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपी सुविधा सुरू राहील. तसेच ओला व उबेर यासारखी टॅक्सी सेवाही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात येईल.
* जे उद्योग सुरू ठेवण्यात येणार आहेत तेथील कामगारांना आरटीपीसीआर कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली होती. दरम्यान हे निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले असून अँटिजेन किटद्वारे केलेल्या निगेटिव्ह कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे.
-----------------------------