आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग रचनांबाबत निर्णय तिन्ही पक्ष एकत्र घेतील: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:22 PM2021-06-04T22:22:06+5:302021-06-04T23:22:51+5:30
राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीला आता एक वर्षा पेक्षा कमी कालावधी राहिला आहे...
पुणे: महापालिका निवडणुकांची प्रभाग रचना कशी करायची याचा निर्णय महाविकास आघाडी मधले तिन्ही पक्ष मिळुन घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. निवडणुका कधी होतील हे मात्र ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही. पक्षांची तयारी सुरु झाली की तुम्हांला आपोआप कळेल असंही ते म्हणाले आहेत.
राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीला आता एक वर्षा पेक्षा कमी कालावधी राहिला आहे. मुंबई, पुणे आणि इतर काही महापालिकांचा यात समावेश आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या वर्षीच काही महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत.
त्यामुळे यंदाच्या निवडणुका वेळेवर होणार का याबाबत विचारले असता पवार म्हणाले “ निवडणुका कधी घ्यायच्या हा निर्णय राज्य सरकार घेत नाही. आणि राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली की कळतेच. ते कोणाला सांगायची गरज पडत नाही”.
दरम्यान, प्रभाग रचना बदलणार का याबाबत बोलताना महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष मिळुन याबाबत निर्णय घेतील असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले “ एक सदस्यीय प्रभाग का दोन याचा निर्णय अजून झाला नाही. यापुर्वी १-२-३ सदस्यीय असं पुर्वी झालं आहे. तेव्हा वेगळी सरकारं होती. आता तिन्ही पक्ष बघु आणि निर्णय घेऊ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.