पुण्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे तीनही कार्यक्रमात मौनच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:21 PM2018-11-17T12:21:34+5:302018-11-17T12:30:22+5:30
पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार,आमदार यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या पाण्याविषयी विचारणा केलेली दिसली नाही.
पुणे : पुण्याचे पाणी कमी होऊ देणार नाही असे आश्वासन महापालिका पदाधिकाऱ्यांना देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या त्यांच्या तीनही जाहीर कार्यक्रमात पुण्याच्या पाण्याविषयी मौनच बाळगले. महापौर व अन्य पदाधिकारी परदेश दौऱ्यावर असल्यामुळे या कार्यक्रमांना अनुपस्थितच होते. पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार,आमदार यांच्यापैकीही कोणी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारणा केलेली दिसली नाही.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘पुण्याचा पाणी पुरवठा सध्या आहे तितकाच ठेवावा’ अशी मागणी करणारे पत्र नळस्टॉप चौकातील कार्यक्रमात दिले, पण या पत्राचे उत्तर त्यांनी काय दिले ते समजू शकले नाही. जलसंपदाने पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार कायम ठेवली आहे. सध्या रोज १३५० दशलक्ष लिटर पाणी मिळते आहे. तरीही ते सलग ५ तास एकवेळ द्यावे लागते. तेही अनेक भागात नियमित मिळत नाही. दररोज ११५० दशलक्ष लिटर पाणीच देणार असे जलसंपदाचे म्हणणे आहे. तसे झाले तर पुणे शहराला तेवढे पाणी पुरवताना महापालिकेची ओढाताण होणार आहे.
त्यामुळेच महापालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुण्याचा पाणी पुरवठा आहे तेवढाच ठेवावा अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुण्याच्या पाण्यात कपात होऊ देणार नाही असे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे तर जलसंपदा खात्याच्या सचिवांशी फोनवर चर्चा करून त्यांना तसा आदेश काढायलाही सांगितले होते. पण आता त्याला पंधरापेक्षा जास्त दिवस झाले तरीही जलसंपदाला असा आदेश मिळालेला नाही. तोंडीही कोणी काही सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे फक्त ११५० दशलक्ष लिटरच पाणी दररोज घ्या असा तगादा लावला आहे.
पुण्यात शुक्रवारी झालेल्या तीन जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री याविषयी काहीतरी बोलतील अशी पुणेकरांची अपेक्षा होती. त्यातही बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करताना ते यावर भाष्य करतील असे बोलले जात होते. मात्र तिथेही त्यांनी निराशा केली. त्यानंतर नळस्टॉप येथे मेट्रो व महापालिका यांच्या संयुक्त कार्यक्रमात उड्डाणपुलाचे भूमीपूजन करत असतानाही त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. याच कार्यक्रमात उपमहापौर डॉ. धेंडे यांनी त्यांना पाणी पुरवठा सध्या आहे तेवढाच कायम ठेवावा अशी मागणी करणारे पत्र दिले. त्यांंंनी कपात होणार नाही असे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.