तीनही ठिकाणी उपनगराध्यक्ष बिनविरोध
By admin | Published: February 16, 2017 02:44 AM2017-02-16T02:44:07+5:302017-02-16T02:44:07+5:30
जेजुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे गणेश निकुडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचेच योगेश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे
जेजुरी : जेजुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे गणेश निकुडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचेच योगेश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बारभाई यांची आज निवड झाली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व सदस्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी अभिनंदन केले.
जेजुरी नगरपालिकेत कॉँग्रेसची सत्ता असून, पालिकेतील बलाबल काँग्रेसचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक आहेत. आज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात पालिकेतील उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक गणेश निकुडे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी काँग्रेसकडून योगेश जगताप यांचे नाव गटनेते सचिन सोनवणे यांनी सुचविले, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते जयदीप बारभाई यांनी दिलीप बारभाई यांचे नाव सुचविले.
पालिकेतील बलबल पाहता, दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार दोहोंचाही प्रत्येकी एक उमेदवार निवडून येत होता. यामुळे योगेश जगताप आणि दिलीप बारभाई यांची ही निवड बिनविरोध झाली.
या वेळी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरध्यक्षा वीणा सोनवणे, काँग्रेसचे गटनेते सचिन सोनवणे, राष्ट्रवादी काँंग्रेसचे गटनेते जयदीप बारभाई, काँग्रेसचे नगरसेवक महेश दरेकर, अजिंक्य देशमुख, बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, पौर्णिमा राऊत, रुक्मिणी जगताप, शीतल बायस, वृषाली कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अरुण बारभाई, अमिना पानसरे, साधना लाखे, सुजाता झगडे, मंगल दोडके, सविता जगताप उपस्थित होत्या.
निवडीनंतर झालेल्या सभेत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गणेश निकुडे व स्वीकृत सदस्य योगेश जगताप यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले, की आता निवडणुका पार पडल्या आहेत. आता लवकरच विविध विषय समीत्यांच्या निवडीही होतील. सर्वांनी एकविचाराने जेजुरीकरांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काम करा. पाच वर्षांत जेजुरी शहर एक ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित झाली पाहिजे. यासाठी माझे तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य राहील.
भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी माजी नगरसेवक भारत निकुडे, हेमंत सोनवणे, राजेंद्र दरेकर, हरिश्चंद्र जगताप, हरिदास रत्नपारखी, अलिम बागवान आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर भंडाऱ्याची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (वार्ताहर)