शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:20+5:302021-05-17T04:10:20+5:30
पुणे : राज्य शासनाकडून रविवारीही लस प्राप्त न झाल्याने व महापालिकेकडील शिल्लक साठ्यातील सर्व लस संपल्या आहेत. त्यामुळे आज ...
पुणे : राज्य शासनाकडून रविवारीही लस प्राप्त न झाल्याने व महापालिकेकडील शिल्लक साठ्यातील सर्व लस संपल्या आहेत. त्यामुळे आज (दि. १७) शहरातील सर्व लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहेत़
राज्य शासनाकडून गुरुवारी रात्री कोव्हॅक्सिनचे ३० हजार लसीचे डोस प्राप्त झाले होते़ हे लसीचे डोस शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय एका लसीकरण केंद्रांवर दोन दिवस वितरित केले. परंतु, सध्या महापालिकेकडे कुठल्याही कंपनीच्या (कोव्हॅक्सिन अथवा कोव्हिशिल्ड) लसीचा डोस शिल्लक नसल्याने, सोमवारी सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़
--
लस आल्या, तरी द्यायच्या कोणाला?
सध्या महापालिकेकडे लस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवत आहेत. मात्र, राज्य शासनाकडून लस आल्या, तरी नवीन नियमानुसार ९४ दिवसांनंतरच लसीचा दुसरा डोस देण्याचे निश्चित केले आहे. त्यातच राज्य शासनाने केवळ लसीचा दुसरा डोसच देण्याचे आदेश यापूर्वी दिलेले आहेत. त्यामुळे नवीन लस आल्या, तरी त्या कोणत्या वयोगटाला द्यायच्या, पहिला डोस द्यायचा की नाही, याबाबतची स्पष्ट नियमावली राज्य शासनाकडून प्राप्त होणे आवश्यक आहे.