महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप; लाचलुचपत करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:22 PM2021-03-03T16:22:01+5:302021-03-03T16:28:18+5:30
20 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा दावा
पुणे : महापालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी केली जाणार आहे. तब्बल महिन्याभरापासून पडून असलेल्या एसीबीच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका आयुक्तांनी ही चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. लांडगे यांची पुणे आणि नाशिकमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा दावा तक्रारदार यांंनी एसीबीकडे केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे.
एका नगरसेविकेने केलेल्या पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करीत केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या ज्योती राम परिहार यांनी लांडगे यांच्याकडे केली होती. वारंवार याबाबत पाठपुरावा करुनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याबाबत, वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या अभियंत्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल दिला होता. हा अहवाल देण्यास लांडगे यांनी नकार दिला.
त्यानंतर, परिहार यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये एसीबीकडे तक्रार अर्ज दाखल केला. या कालावधीत परिहार यांनी लांडगे यांच्या पुण्यातील बाणेर, निगडी, मांजरी, कल्याणीनगर आणि नाशिक येथील मालमत्तांची माहिती मिळविली. तसेच त्यांच्याशी संबंधित विम्याची कागदपत्रे, बँकांचे स्टेटमेंटही मिळविले. ही सर्व कागदपत्रे एसीबीला सादर करण्यात आली. एसीबीने ही कागदपत्रे दाखल करुन घेतली. त्याचा अहवाल तयार करुन एसीबीच्या पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये पाठविला.
महासंचालक कार्यालयाकडून महापालिका आयुक्तांना लोखंडे यांची उघड चौकशी करण्यास परवानगी देण्याबाबत पत्र पाठविण्यात आले होते. जवळपास एक महिना या पत्रावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत परिहार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाला गती प्राप्त झाली. पालिकेच्या प्रशासन विभागाकडून आयुक्त कार्यालयाकडे चौकशी करण्याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास परवानगी दिली.
====
20 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा दावा
लांडगे यांच्या बाणेर, निगडी, कल्याणीनगर, मांजरीसह नाशिकमध्ये मालमत्ता आहेत. तसेच विमा, बँक आदी कागदपत्रांवरुन ही मालमत्ता 20 कोटींपेक्षा अधिक असल्याचा आमचा दावा आहे. याबाबत एसीबीकडे आम्ही तक्रार केली होती. त्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
- ज्योती राम परिहार, संस्थापक अध्यक्षा, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान
====
लांडगे यांनी आरोप फेटाळले
लोकप्रतिनिधींमधील वादाची पार्श्वभूमी या तक्रारीला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. माझ्या अधिकारात नसलेली कारवाई करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता. याबाबत मी प्रशासनाला आणि वरिष्ठांना लेखी म्हणणे कळविले आहे. याबाबत कायदेशीर मतही मागविण्यात आले होते. मालमत्तेची चौकशी करावी अशा स्वरुपाच्या तक्रारी केवळ मानसिक त्रास देण्यासाठी केल्या जात आहेत.
- विजय लांडगे, सहायक आयुक्त, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय