आमदार संजय शिंदे यांच्याकडून फसवणुकीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:31+5:302021-06-17T04:09:31+5:30
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेतून ...
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेतून २२ कोटी ११ लाखांचे कर्ज घेतले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याबाबत सोलापूरचे अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही केली आहे. मात्र काही उत्तर न आल्याने बुधवारी पुण्यातील कॅम्पमध्ये असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेसमोर शेतकऱ्यांनी हातात भिकेचा कटोरा घेत, हलगी वाजवत आंदोलन केले.
बँकेकडून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, अशा नोटिसा गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही. अशावेळी अन्नदात्याने कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्नही उजनी धरण बचाव समितीचे प्रमुख अतुल खुपसे यांनी केला आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या कर्ज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहा महिने लागतील, असा अर्ज आमच्याकडे सोपवला आहे. पण शेतकऱ्यांनी सहा महिने करायचं काय? त्यांच्या पोटापाण्यासाठी कर्ज मिळणे गरजेचे आहे. आमदार संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आमदार संजय शिंदे यांनी कर्ज घेतल्याचे पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितले होते. शिंदे हे आधीपासूनच राष्ट्रवादी आणि भाजपशी जवळीक साधून आहेत. त्यांचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची भेट टाळली असल्याचा आरोपही खुपसे यांनी केला आहे.