तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत मनमानी करत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:31+5:302021-07-04T04:08:31+5:30

तळेगाव ढमढेरे : येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची ...

Allegation that Talegaon Dhamdhere Gram Panchayat is acting arbitrarily | तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत मनमानी करत असल्याचा आरोप

तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत मनमानी करत असल्याचा आरोप

Next

तळेगाव ढमढेरे : येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. ग्रामपंचायतचे सदस्य आरती भुजबळ, अॅड. सुरेश भुजबळ, संतोष ढमढेरे, विशाल आल्हाट, कीर्ती गायकवाड, जबीन बागवान व रोहिणी तोडकर यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून ग्रामपंचायतच्या मनमानीबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अलीकडील कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांनी महत्त्वाच्या कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडूनही काही कर्मचाऱ्यांना अनेक दिवसांपासून सेवा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने अचानकपणे कामावरून कमी केल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना देखील ग्रामपंचायतने सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. तसेच २०१७ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीच भरला नसल्याचे समोर आले आहे. ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता प्रोसेडिंगमध्ये ठराव नसतानादेखील ठराव मंजूर दाखवून खोटे प्रोसेडिंग तयार करत असून मासिक मीटिंगचे नक्कल सभासदांना वेळेवर देत नाहीत. ग्रामविकास अधिकारी मासिक सभेमध्ये विषय मंजूर न करता परस्पर बिलांची मोठी रक्कम देत आहेत. तसेच सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे अधिकाराचा गैरवापर करून परस्पर टेंडर देतात. गावातील कामे नित्कृष्ट तसेच अपूर्ण असताना देखील ठेकेदारांची बिले अदा केली जात असल्याचा आरोप आहे.

ग्रामविकास अधिकारी हे तळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या जाणीवपूर्वक नोंदी करत नाहीत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील कर जाणीवपूर्वक वसूल करत नाहीत व सदस्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या प्रकरणात अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने सदर प्रकारची चौकशी करण्याची मागणी सदर ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतमध्ये असे प्रकार घडलेले नसून सदस्यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी बाबत आपल्याला काही माहिती नसल्याचेही ग्रामविकास अधिकारी खेडकर यांनी सांगितले.

-तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत बाबत काही सदस्यांची तक्रार प्राप्त झालेली असून विस्तार अधिकारी यांना सदर प्रकारच्या चौकशीचे आदेश दिलेले असून पुढील आठवड्यात विस्तार अधिकारी सदर प्रकाराची चौकशी करणार आहेत.

विजयसिंह नलावडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर

Web Title: Allegation that Talegaon Dhamdhere Gram Panchayat is acting arbitrarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.