माझ्या विरूध्दच्या तक्रारी खोट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:55+5:302020-12-07T04:08:55+5:30
........................................ पुणे: किरकटवाडी गावातील विविध विकासकामांबद्दल माझ्याविरूध्द केलेल्या तक्रारीच्या आधारे गट विकास अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल हा वस्तुस्थितीचा विपर्यास ...
........................................
पुणे: किरकटवाडी गावातील विविध विकासकामांबद्दल माझ्याविरूध्द केलेल्या तक्रारीच्या आधारे गट विकास अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल हा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, असा खुलासा सरपंच गोकुळ करंजावणे यांनी केला आहे.
ʻकिरकटवाडी सरपंचाचे पद आले धोक्यातʼ अशा आशयाचे वृत्त रविवारी ʻलोकमतʼमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यामध्ये, गावातील विकासकमांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याआधारे, गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून आपला अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केल्याने करंजावणे यांचे पद धोक्यात आल्याचेही नमूद करण्यात आले होते.
याबाबत करंजावणे म्हणाले, मुळातच गट विकास अधिकाऱ्यांनी मला पाठवलेली कारणे दाखवा नोटीस मला विलंबाने मिळाली. त्यामुळे आमची बाजू विचारात न घेताच एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला. मात्र, १८ नोव्हेंबरला मी नोटीसला सविस्तर उत्तर दिले आहे. त्यात, सर्व पाचही कामांची अंदाजपत्रकीय तरतूद, तांत्रिक मान्यता आणि ग्रामपंचायतीचा ठराव आदी आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता नियमानुसारच करण्यात आली होती. त्यानुसार ʻइ निविदाʼ काढूनच ठेकेदार निवडण्यात आले होते. बहूतांश कामे पुर्ण झाल्याचे गट विकास अधिकाऱ्यांच्याच अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी गैरहेतु मनात ठेवून माझ्याविरूध्द खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट होते. गावात विकासकामेच होऊ द्यायची नाहीत किंबहूना त्यात अडथळा आणून स्वत:चे उखळ पांढरे करून घ्यावयाचे, या गैरहेतूने आरोप केल्याचेही, करंजावणे यांनी सांगितले.
वस्तुस्थितीचा विपर्यास करून आरोप केल्याने आमच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.
.......................
थेट जनतेतून निवडुन आल्यापासून मला जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. गावात मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकासकामांमुळे विरोधक बेचैन झाले असून राजकीय आकसातुन आणि ठेकेदारीसाठी काहींनी एकत्र येऊन माझ्या विरोधात कारस्थान रचले आहे.
- गोकुळ करंजावणे, सरपंच, किरकटवाडी