दिशाभूल करण्यासाठी बिनबुडाचे आरोप, खासदार आढळराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 11:07 PM2018-11-11T23:07:46+5:302018-11-11T23:08:06+5:30
खासदार आढळराव पाटील : विरोधकांकडे माझ्याविरुद्ध उमेदवारच नाही
घोडेगाव : विरोधकांकडे माझ्याविरुद्ध उभे राहील, असा उमेदवारच नाही, म्हणून जनतेची दिशाभूल करण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. विमानतळ, वाहतूककोंडी, बैलगाडा शर्यती या विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला यापूर्वीच उत्तर दिले आहे, तरी तेच तेच उकरून काढून टीका केली जात आहे, पण अशा टीकांमुळे काम थांबणार नाही, अशी सडकून टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी पाटील बोलत होते. उपतालुका प्रमुखपदी गोविंद काळे, घोडेगाव शहर प्रमुखपदी तुकाराम काळे, मागासवर्गीय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी खंडू खंडागळे, शहर संघटकपदीविजय काळे यांची निवड झाल्याबद्दल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुण गिरे, राजू जवळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, महेश ढमढेरे, प्रशांत काळे, दिलीप पवळे, रवींद्र वळसे, अंकुश लांडे, अनिल काळे उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले
भीमाशंकर कारखान्याला एवढी बक्षिसे मिळतात मग भाव कमी का देतात, बाकीचे कारखाने २९०० ते ३००० रुपये भाव देतात; मग आपल्या कारखान्याला जास्त भाव द्यायला काय फरक पडतो. बाकीची कपात न करता शेतकऱ्यांना भाव द्या.
कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होवू शकतात. त्यादृष्टीने सर्वांनी तयारीला लागा, युती होईल न होईल याची वाट न पहाता बुथनुसार काम सुरू करा. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका लागल्यानंतर आपल्या निवडणुका एकत्र होतील कि वेगवेगळ्या याचे चित्र स्पष्ट होईल, म्हणून सर्वांनी तयारीला लागले पाहिजे.