खेडच्या महिला तहसीलदारांच्या पतीवर केलेले आरोप जनतेची दिशाभूल करणारे;राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:39 PM2020-08-10T15:39:22+5:302020-08-10T15:46:23+5:30
स्वतःच्या मताचे अधिकारी आणण्याचा आमदारांचा डाव असून महाविकास आघाडी सरकार असल्याने हाणून पाडला जाईल..
राजगुरुनगर: आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या विरोधात केलेली तक्रार चुकीची व जनतेची दिशाभूल करणारी आहे असा आरोप माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे. ते आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत बोलत होते.
तहसीलदार सुचित्रा आमले यांनी कोरोना कालावधीत अतिशय उत्तम प्रकारे काम केले असून रूग्ण संख्या तालुक्यात अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. ऑक्टोबर २०१८ पासून खेडच्या तहसीलदार म्हणून त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. बदलीचा विषय हा प्रशासनाचा असून अधिकारी ऐकत नसतील तर अशा पद्धतीने आरोप करून स्वतःच्या मताचे अधिकारी आणण्याचा डाव आमदार मोहिते यांचा असून तो महाविकास आघाडी सरकार असल्याने हाणून पाडला जाईल असे गोरे यांनी सांगितले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तक्रारीत बाळासाहेब आमले यांचा प्रत्यक्ष संबंध आला नसून अप्रत्यक्ष धमकी दिल्याचे म्हटले आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांनी आमदार दिलीपराव मोहीते यांना धमकी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे. धमकी कोण कोणाला देते हे पाहणे गरजचे आहे. विद्यमान आमदारांना स्वतःच्या मर्जीतील अधिकारी हवे असल्याने तहसीलदार सुचित्रा आमले यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले योगदान दिले असुनही व त्यांचा नियमानुसार कार्यकाळ बाकी असूनही पोलीस स्टेशनला त्यांच्या पतीविरोधात तक्रार देऊन वेगळे वळण दिले आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांनी आमदार दिलीपराव मोहिते व तहसीलदार सुचित्रा आमले यांच्यातील संघर्षात उडी घेत तहसीलदारांच्या कार्याचे कौतुक केल्याने पुढे काय होणार याचे खेड तालुक्यातील जनतेत औत्सुक्य आहे.