यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची चिंताच मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:36+5:302021-03-04T04:20:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उन्हाळा तोंडावर आला की महापालिकेला पाणीपुरवठ्याची चिंता पडते. पाणीकपातीचे नियोजन करावे लागते. यंदा ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उन्हाळा तोंडावर आला की महापालिकेला पाणीपुरवठ्याची चिंता पडते. पाणीकपातीचे नियोजन करावे लागते. यंदा ही चिंताच मिटली आहे. कारण, खडकवासला धरण साखळीत २०.०२ टीएमसी पाठीसाठा असून गेल्या वर्षीपेक्षा दोन टीएमसी पाणी जास्त आहे. त्यातच यंदा भामा आसखेड योजनेचे पाणी मिळणार असल्याने पूर्व भागाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची पुणेकरांची चिंता मिटली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या सर्व धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठा २९.५० टीएमसी आहे. शहरासाठी सुमारे साडेअकरा टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. मात्र, पालिकेकडून प्रत्यक्षात १६ ते १७ टीएमसी पाणी घेतले जाते. डिसेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे धरणसाखळीत अद्यापही २०.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठ्यातील शहराला ६ ते ७ टीएमसी पाणी पुरणार आहे.
शहराच्या विविध भागात आजही कमीदाबाने पाणी येणे, पाणीच न येणे, टँकरने पाणीपुरवठा सुरू असणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाजीनगरसारख्या मध्यवस्तीतील पाणीप्रश्नही अद्याप मार्गी लागलेला नाही. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होतो. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील पाण्यात कपात केली जाते. यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट
उन्हाळ्यात कपात नाही
“खडकवासला धरणसाखळीत गेल्या वर्षीपेक्षा दोन टीएमसी अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. भामा आसखेड योजनेचे पाणी पूर्व भागाला मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कपात करावी लागणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत राहील.”
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग
चौकट
धरणामधील पाणीसाठा
खडकवासला - ०.९८ टीएमसी
पानशेत - ९.४० टीएमसी
वरसगाव - ९.१४ टीएमसी
टेमघर - ०.५१ टीएमसी