आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबतच्या' युती ' चा फेरविचार व्हावा : अस्वस्थ आठवले गट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:28 AM2019-02-13T11:28:45+5:302019-02-13T11:31:00+5:30
रामदास आठवले यांनी भाजपाबरोबर युती केली. त्याचवेळी राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या...
पुणे: समाजाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देऊन भाजपाने स्वस्थ बसवले. मात्र, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सत्तेत वाटा दिला नाही अशी खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राज्यातील दलित मतांचा कोटा रिपाईच्या माध्यमातून वापरून घेतला, याप्रकारची भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्यातूनच भाजपा बरोबरच्या युतीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेरविचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रामदास आठवले यांनी मागील वेळी भाजपाबरोबर युती केली. त्याचवेळी राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पुरोगामी विचारांचा, डॉ. आंबेडकर यांना मानणारा रिपाई उजव्या विचारांच्या, देवदेवतांवर, राममंदीरावर विश्वास ठेवणाऱ्या भाजपा बरोबर नांदणार कसा असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. मात्र आठवले यांनी कोणाचेही न ऐकता युती जाहीर केली. इतकेच नव्हे तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाच्या मागणीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या म्हणजे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले. पुणे महापालिका हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. रिपाई (आठवले गट) चे ५ उमेदवार महापालिकेत निवडून आले, मात्र ते सर्व भाजपाच्या कमळ या चिन्हावरचे आहेत. त्यामुळेच महापालिकेत पक्षाचा स्वतंत्र गट तयार करताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या.
आठवले यांच्या आदेशानुसार बहुसंख्य ठिकाणी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी भाजपासोबत काम केले आहे. या युतीत भाजपाने आठवले यांनी केंद्रात समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री पद दिले आहे. मात्र ते वगळता कुठेही विधानपरिषद किंवा विधानसभेला जागा दिलेल्या नाहीत. सत्तेचे कोणतेही अन्य पद केंद्रात किंवा राज्यातही दिलेले नाही. पुणे महापालिकेतही केवळ उपमहापौर पद देऊन सत्तेत अन्य कोणताही वाटा दिलेला नाही. पक्षासाठी साधे कार्यालय मागतानाही रिपाई कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. नव्या इमारतीतही रिपाईला स्वतंत्र कार्यालय देण्यास भाजपा तयार नाही, त्यामुळेच उपमहापौर अजूनही जुन्या इमारतीमध्येच ठाण मांडून बसले आहेत.
रिपाईच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात आता राज्यस्तरावर याबाबत उघड चर्चा होऊ लागली आहे. सत्तेतून समाजाला काही देता येईल, काही योजना राबवता येतील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक उन्नती साधता येईल अशा हेतूने भाजपाबरोबर जायचा निर्णय आठवले यांनी घेतला होता. हेच सांगून त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या तो गळी उतरवला होता. त्यामुळेच भाजपाला राज्यातील सत्ता मिळाली. सर्व दलित मते एकगठ्ठा भाजपाच्या झोळीत पडली. भाजपाच्या एकूण मतांच्या संख्येत या मतांचा वाटा किमान २० टक्के आहे. त्या तुलनेत रिपाईला सत्तेत काहीच वाटा मिळालेला नाही असे रिपाई कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीचा फेरविचार करावा अशी मागणी रिपाईच्या कार्यकर्त्यात जोर धरत आहे. पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यासाठी काही पदाधिकारी लवकरच आठवले यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सांगणार असल्याचे समजते.
----------------------------------------------
आठवले यांचा निर्णय मान्य असेल
पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे हे खरे आहे. कारण केंद्रात, राज्यात व महापालिकांमध्ये सत्ता असूनही भाजपाने कधीही रिपाई कार्यकर्त्यांना कधीही सत्तेतील वाटा दिला नाही. सभांमध्ये खुर्ची देण्यावरूनही काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. त्यात्या वेळी आठवले यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या. आताही नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांच्याकडे अडचणी मांडू शकतात. आठवले जो काही निर्णय देतील तो सर्वांना मान्य असेल.
बाळासाहेब जानराव, राज्य सरचिटणीस, रिपाई (आठवले गट)