युती फिक्स पण स्थानिक युतीचं काय ? शिरूर, मावळवर भाजपाने केला दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:41 AM2019-02-20T00:41:59+5:302019-02-20T00:42:10+5:30

लोकसभा निवडणूक : युतीच्या घोषणेनंतरही भाजपाच्या नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Alliance fixes but what about the local alliance? Shirur, BJP claims claim on Maval | युती फिक्स पण स्थानिक युतीचं काय ? शिरूर, मावळवर भाजपाने केला दावा

युती फिक्स पण स्थानिक युतीचं काय ? शिरूर, मावळवर भाजपाने केला दावा

Next

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. त्यानंतरही शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमधील विधानसभेतील आमदारांना सोडण्याची मागणी भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज केली.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजपाच्या काही नगरसेवकांनी पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दावा केला. बारणेंना उमेदवारी दिली तर काम करणार नाही, अशीही भूमिका घेतली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भाजपाच्या संकल्प मेळाव्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपालाच मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बारणे यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुंपली होती. बारणे नकोच असा सूर भाजपातील काही ज्येष्ठ, तसेच राष्टÑवादीतून काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनी आळविला होता.
दुसरीकडे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यावरील मारहाणीचा दखलपात्र गुन्हा भाजपा नेत्यांच्या दबावाने दाखल केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. युतीची घोषणा केली असली तरी पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना व भाजपाच्या नेत्यांत व नगरसेवकांत अस्वस्थता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे दौरा आज होता. त्या वेळी नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, शीतल शिंदे, अभिषेक बारणे, तुषार कामठे, तुषार हिंगे, सुरेश चिंचवडे, कैलास बारणे, नगरसेविका झामाबाई बारणे, आरती चोंधे, उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, माया बारणे, अर्चना बारणे, शर्मिला बाबर यांनी भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपा मिळावा, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

आमदार, महापौरांनी घेतली भेट
४शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय झाल्यानंतरही मावळ पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघांवरही भाजपाने दावा केला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडावा, अशी मागणी केली आहे. या वेळी महापौर राहुल जाधव उपस्थित होते. भाजपासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पूरक आणि पोषक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली. शिरूर भाजपाला सोडल्यास उमेदवार निश्चितच निवडून येईल. उमेदवारी न दिल्यास नाराजीला सामोरे जावे लागेल, असेही लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मनोमिलन होणार कसे?
४पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून शिवसेना नेते
आणि नगरसेवकांना टार्गेट
केले जात आहे. त्यावरून स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांत जुंपली आहे. युतीचा तिढा सुटला असला, तरी भाजपा आणि शिवसेनेतील नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, होणार की नाही, हा प्रश्नच आहे.

Web Title: Alliance fixes but what about the local alliance? Shirur, BJP claims claim on Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे