राजगुरुनगरला नगराध्यक्षपदासाठी युती
By admin | Published: May 11, 2015 06:00 AM2015-05-11T06:00:14+5:302015-05-11T06:00:14+5:30
राजगुरुनगर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष करण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याची माहिती मावळचे आमदार बाळाभेगडे यांनी दिली.
दावडी : राजगुरुनगर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष करण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याची माहिती मावळचे आमदार बाळाभेगडे यांनी आज (दि.१0) पत्रकार परिषदेत दिली.
राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी येत्या १६ तारखेला निवडणूक होणार असून, यासाठी नगरपरिषदेवर भाजपा-सेनेची सत्ता आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरूआहेत.
या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी आज येथील विश्रामग्रहात भेगडे
यांनी पत्रकार परिषद घेऊन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाबाबत भाजपा नेत्यांची वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीमधील भूमिका स्पष्ट केली.
या पत्रकार परिषदेसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शा. ल. घुमटकर, भाजपाचे युवानेते अतुल देशमुख, शहर प्रमुख विष्णू बोऱ्हाडे, मंगेश गुंडाळ यांच्यासह भाजपाच्या बाजूने असलेल्या अपक्ष नगरसेविका सुरेखा क्षोत्रिय यांच्यासह नगरसेवक शिवाजी मांदळे, नंदा जाधव, मनोहर सांडभोर, संपदा सांडभोर, संगीता गायकवाड, स्नेहलता गुंडाळ, अर्चना घुमटकर उपस्थित होते.
भेगडे यांनी सांगितले, की भाजपाने प्रथमच राजगुरुनगर परिषद स्वबळावर लढविली आहे. त्यात पक्षाला मोठे यश मिळाले. बहुमत मिळण्यासाठी १0 जागांवरसत्ता येणे अपेक्षित होते; मात्र तसे घडले नाही. तरीही नगर परिषदेत सात जागा मिळवत यश मिळविले. या नगर परिषदेत भाजपा ७, शिवसेना २ तर अपक्ष ९ असे बलाबल आहे. जरी निवडणुकीमध्ये सेना-भाजपा युती झाली नसली तरी नगराध्यक्ष निवडीसाठी सेना-भाजपाची युती होणार आहे.
याबाबत नुकतीच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव
पाटील, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ आदी नेत्यांबरोबर राजगुरुनगर नगर परिषदेवर भाजपा-सेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा झाली आहे. यामध्ये नगराध्यक्ष भाजपाचा तर उपनगराध्यक्ष शिवसेनेचा असा निर्णय झाला आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाचा निर्णय १५ तारखेला अंतिम घेतला जाणार आहे. (वार्ताहर)