महाविद्यालयांमध्ये जल्लोषात गुणपत्रिकांचे वाटप
By Admin | Published: June 10, 2017 02:14 AM2017-06-10T02:14:19+5:302017-06-10T02:14:19+5:30
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद.... पालकांच्या डोळ्यांत पाल्याबद्दल झळकणारे कौैतुक.. मित्र-मैत्रिणींकडून होणारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद.... पालकांच्या डोळ्यांत पाल्याबद्दल झळकणारे कौैतुक.. मित्र-मैत्रिणींकडून
होणारा अभिनंदनाचा वर्षाव अशा वातावरणात विविध महाविद्यालयांत बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
बारावीचा आॅनलाईन निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने महाविद्यालयात आले; त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. निकालाच्या आनंदाने महाविद्यालयांचा परिसर फुलून गेला होता. फर्ग्युसन, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयांसह अनेक महाविद्यालयांमध्ये बारावीत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचा निकाल ९९ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.१९ टक्के लागला. फर्ग्युसन महाविद्यालयात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे संचालक राम निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्य महादेव हाके यांची उपस्थिती होती.
बीएमसीसी महाविद्यालयात १२वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जे.आर.व्ही.जी.पी.चे संचालक श्रीकृष्ण कानेटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, उपप्राचार्य डॉ. सी. एम. नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी गुणगौैरव सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांची शिकविण्याची सहजसोपी पद्धत, पालकांचा पाठिंबा, कॉलेजकडून मिळालेले प्रोत्साहन आणि नियमित अभ्यास यांमुळे परीक्षेत यश मिळाल्याच्या भावना गुणवंतांनी व्यक्त केल्या.