सरसकट सर्व पुणेकरांना लस देण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:35+5:302021-03-23T04:11:35+5:30
पुणे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातच लसींचा तुटवडा भासत असून लसींसाठी ...
पुणे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातच लसींचा तुटवडा भासत असून लसींसाठी शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सरसकट सर्व पुणेकरांना लसीकरण करण्याची परवानगी पुणे महापालिकेला द्यावी, अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. शहरात ९४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दिवसाला १५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना लस दिली जात आहे.
हे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. परंतु, शहरात सध्या मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी लसीची अवस्था आहे.
सर्व पुणेकरांना सरसकट लस देण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे. त्याकरिता साधारणपणे ५० लाख लस लागणार आहेत. पालिकेला त्याकरिता ५० कोटींचा खर्च येऊ शकतो. एवढा खर्च सीएसआर अथवा अन्य माध्यमातून उभारणे पालिकेला शक्य असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून परवानगी मागण्यात आली आहे.
----------
शहरातील वाढती रुग्णसंख्या, लसींची वाढती मागणी पाहता लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून १८ वर्षांपुढील सर्व पुणेकरांना सरसकट लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. साधारणपणे त्याला ५० कोटींचा खर्च येऊ शकेल. हा खर्च सीएसआर व अन्य पर्यायांमधून उपलब्ध करून घेता येईल.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका