Pune Porsche Accident: पोलीस म्हणतात, पोर्शे प्रकरणातील मुलाला प्रौढ समजून खटला चालविण्यास परवानगी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:45 PM2024-08-29T12:45:46+5:302024-08-29T12:46:01+5:30
अपघातातील कार परत मिळण्यासाठी, अल्पवयीन मुलाचा पासपोर्ट मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी जेजेबीत अर्ज केला आहे
पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणात अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाचा पासपोर्ट व पोर्शे कार परत मिळावी यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे; तर अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्यावर खटला चालविण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेजेबी) अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जांवर आता २६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी १९ मे रोजी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
बाल न्याय मंडळाने मुलाला जामीन देताना निबंध लिहिण्याची अट टाकल्याने समाजात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर पुन्हा त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले. यादरम्यान, मुलाच्या आत्याने त्याला सुधारगृहातून बाहेर काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत मुलाला जामीन मंजूर केला आणि मुलाचा ताबा आत्याच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, मुलाला प्रौढ ठरवत त्यावर खटला चालवायचा असेल तर या गुन्ह्यात पोलिसांना मुलाला जेजेबीमध्ये हजर केल्यापासून ३० दिवसांत पोलिस तपासाचा अहवाल (दोषारोपपत्र) दाखल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळेत अहवाल सादर केला आहे. सध्या त्याचे आई-वडील आणि ससूनमधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. अपघातातील कार परत मिळण्यासाठी, तसेच अल्पवयीन मुलाचा पासपोर्ट मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी जेजेबीत अर्ज केला आहे. या अर्जावर २८ ऑगस्टला पुढील सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “पोलिसांनी औपचारिकपणे मुलाचा पासपोर्ट जप्त केलेला नाही; केवळ तो तपासादरम्यान घेण्यात आला होता. आम्ही लवकरच या विषयावर आमची भूमिका मांडू.”
बचाव पक्षाचे म्हणणे लेखी सादर
सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायनिवाड्याचा दाखला देत न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलाला प्रौढ ठरविता येणार नाही, असे पोलिसांच्या अर्जावर बचाव पक्षाच्या वकिलांनी लेखी म्हणणे सादर केले असल्याची माहिती मिळाली आहे.