‘पीएमपी’ ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची द्या परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:45+5:302021-04-09T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पीएमपी बंद असल्याने शहरातील गरजू नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान ५० टक्के क्षमतेने पीएमपी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पीएमपी बंद असल्याने शहरातील गरजू नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान ५० टक्के क्षमतेने पीएमपी सुरू करण्याची मागणी पीएमपी प्रशासन सरकारकडे करणार आहे. नागरिकांकडून गाडी सुरू करण्यासाठी येत असलेल्या पत्रांचा हवाला त्यासाठी दिला जाणार आहे.
आरोग्यविषयक सर्व नियमांचे आधीही पालन करण्यात येत होते, आताही करण्यात येईल असे कळवण्यात येणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, नागरिकांची प्रशासनाकडे रोज पीएमपी सुरू करण्यासंबंधी पत्र येत आहेत. विशेषतः मोलकरणी, स्वयंपाक करणाऱ्या महिला यांची फार अडचण झाली आहे. स्वतःचे वाहन नाही, रिक्षा परवडत नाही, यामुळे काम सुरू असूनही त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. अशांसाठी काही मार्गांवर गाड्या सुरू केल्या, तर ५० टक्के प्रमाणे गाड्या सुरू राहतील व त्याचा संबंधित नागरिक तसेच पीएमपीला फायदा होईल.
जगताप म्हणाले की, पीएमपीने कोरोना टाळेबंदीनंतर १ कोटी २५ लाख रुपयांचे रोजच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठले होते. आता पुन्हा पीएमपी पूर्ण बंद झाली आहे. कामगारांच्या वेतनासाठी पीएमपीला दरमहा ४५ कोटी रुपये लागतातच. ५० टक्के क्षमतेने गाड्या सुरू राहिल्या तर त्यातून किमान उत्पन्न मिळेल.
तसेही अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून सध्या ६४ गाड्या सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. सरकारी कर्मचारी, डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी ही विशेष सेवा पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच दोन्ही शहरांमधील किमान काही मार्गांवर तरी ५० टक्के क्षमतेने पीएमपी सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.