सोसायट्यांमध्ये लसीकरणाला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:46+5:302021-03-21T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मोठ्या सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी पुणेकर नागरिकांनी केली आहे. लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मोठ्या सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी पुणेकर नागरिकांनी केली आहे. लसीकरण हा सर्वसामान्यांचा हक्क आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये लसीकरण झाल्यास त्याचा फायदा होवू शकेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपणही याबाबत विचारणा केली असता राज्य सरकारने आपल्याला परवानगी नसल्याचे सांगितल्याचे म्हणले आहे. काही अडचण निर्माण झाल्यास उपचारांची सुविधा असावी असे सांगत लसीकरण केंद्र रुग्णालयांमध्येच असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त पुणेकरांचे लसीकरण व्हावे यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र यानंतरही केंद्रावर जाण्याची भिती आणि लसीबद्दल गैरसमज यामुळे लोक लसीकरण करणे टाळत आहेत. या पार्श्वभुमीवर काही रुग्णालयांचे प्रतिनिधी हे सोसायट्यांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देत आहेत. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाची अशी सोय उपलब्ध करुन देण्याची जावी मागणी नागरिक करत आहेत.
याविषयी बोलताना पुण्यातले नागरिक रविंद्र सिन्हा म्हणाले, “पुण्यात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून अशी विनंती करत आहोत की पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी. दरम्यान पुण्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जायला त्रास होते आहे. त्यातच रुग्णालये सोय करुन द्यायला इच्छुक आहेत. त्यामुळे वैद्यकीय निगराणी मध्ये लसीकरण करण्यास तसेच अशी केंद्रे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे.”
चौकट
महापालिकेने मात्र अशी परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, “आम्ही देखील याबाबत विचारणा केली होती. मात्र लसीकरणानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास अडचण येवू शकते. हे लक्षात घेवूनच सरकारी प्रॅाटोकॅाल ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयातच लसीकरण करणे आवश्यक आहे.”