केंद्राकडून येणारे व्हेंटिलेटर्स खासगी हाॅस्पिटलला वापरण्यास द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:41+5:302021-04-14T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्व शासकीय रुग्णालयांना लोकसहभागाद्वारे, सी.एस.आर. निधी आणि शासकीय निधीमधून व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या व्हेंटिलेटर्सचा वापर प्राधान्याने शासकीय संस्थामध्ये करण्यात येत आहे. परंतु, काही शासकीय संस्थांमध्ये अपुरे मनुष्यबळ व अपुऱ्या आवश्यक असणाऱ्या सुविधा इत्यादी कारणांमुळे व्हेंटिलेटर्स उपलब्ध असूनही त्याचा वापर होत नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वापराविना असलेले आणि केंद्राकडे नव्याने येणारे व्हेंटिलेटर ज्या खासगी हाॅस्पिटलमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध आहेत, तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध आहे, ऑक्सिजन सुविधा आहेत व व्हेंटिलेटर्स वापर करता येणारे प्रशिक्षित डॉक्टर/आरोग्य कर्मचारी आहेत हे त्यांना देण्यात यावेत, या मागणीचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.
व्हेंटिलेटर्सचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने शासकीय आरोग्य संस्थांमधील विविध स्त्रोतांमधून प्राप्त झालेले व वापरात नसलेले वापरण्यायोग्य व्हेंटिलेटर्स ज्या खासगी आरोग्य संस्थामध्ये आॅक्सिजन बेड, अतिदक्षता बेड्स व प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध आहेत, अशा संस्थेस करारनामा करुन वापरण्यासाठी देण्यात यावेत. ही रुग्णालये हे व्हेंटिलेटर्सचा वापर कोविड रुग्णांसाठी करतील. तसेच रुग्णालयांनी हे व्हेंटिलेटर्स ज्या रुग्णांना वापरण्यासाठी दिलेले आहेत, अशा रुग्णांकडून ऑक्सिजन बेड्साठी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे दर आकारावेत. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही केल्यास सध्याच्या साथरोग्य परिस्थितीमध्ये विविध माध्यमातून उपलब्ध होणारे व्हेंटिलेटर्सचा वापर कोविड रुग्णांसाठी केला जाईल व सर्व व्हेंटिलेटर्सचा वापर योग्यरीत्या होईल, अशी धारणा आहे.