दौंड तालुक्याच्या पूर्वभागात ऊसबांधणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:17+5:302021-06-02T04:10:17+5:30

दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदीकिनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, ...

Almost all the farmers in the eastern part of Daund taluka for sugarcane cultivation | दौंड तालुक्याच्या पूर्वभागात ऊसबांधणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

दौंड तालुक्याच्या पूर्वभागात ऊसबांधणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Next

दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदीकिनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीच्या बॅकवाॅटरचे पाणी मिळत असल्याने या गावाची शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. भरपूर पाण्याच्या उपलब्धतेमुळे या भागातील शेतकरी ऊस हेच पीक प्राधान्याने घेत आलेला आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार हे गृहीत धरून येथील शेतकऱ्र्यांची सध्या ऊस पिकाची कच्ची व पक्की बांधणी उरकण्यासाठी धडपड सुरू आहे.

उपलब्ध पाणी, विजेचे भारनियमन, कोरोना महामारीचे संकट यावर रात्रंदिवस मेहनत करून संकटांवर मात करत त्याने आपला मळा फुलवला आहे. या परिसरातील शेतकरी साधारणपणे १०० ते १२० दिवसांनी पीकवाढीच्या परिस्थितीनुसार मोठी बांधणी करतो. यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणारे बैलअवजार (रिजर) किंवा छोट्या टॅक्टरच्या साह्याने मोठी बांधणी करतो. दिवसेंदिवस कमी होत असलेले पशुधनामुळे बांधणीसाठी बैल उपलब्ध होत नाहीत. अशावेळी छोट्या टॅक्टरच्या साहाय्याने या भागातील शेतकरी बांधणी करत आहेत.

--

ऊस फुटव्यांची चांगली वाढ झाल्यानंतर योग्य वेळी मोठी बांधणी करावी. कारण उसामध्ये कायमस्वरूपी फुटवे येत असतात. परंतु नंतर येणाऱ्या फुटव्यांचे पक्व ऊस होऊ शकत नाहीत. त्यासाठी वेळेवर मोठी बांधणी केल्याने उशिराचे येणारे फुटवे थांबवून उसाची जोमदार वाढ होण्यासाठी मदत होते. मोठी बांधणी भक्कम झाल्यास उशिरा येणाऱ्या फुटव्यांना आळा बसतो. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते. तयार झालेले मोठे कोंब कांडी तयार करण्यास उपयुक्त ठरतात.

- शरद काळे

कृषी सहायक बोरीबेल, ता. दौंड.

--

चौकट १

सध्या राजेगाव परिसरात ऊस बांधणीचे दर पुढीलप्रमाणे आहेत. तीनचाकी ट्रॅक्टर - १५०० रुपये एकर

चारचाकी ट्रॅक्टर - १७०० रुपये एकर

बैलबांधणी चाळीस - २००० रुपये एकर

जर सरीमधील अंतर कमी म्हणजे चार फूटच असेल, तर बैलबांधणी कधीही चांगली आहे. बैलबांधणीमुळे रानाचा तुडवा कमी होतो. शिवाय रानाची मेहनत चांगली होऊन सरीला चांगली मातीची थापही बसते. त्यामुळे उसाला कोंब फुटण्याचे प्रमाण जास्त राहते.

Web Title: Almost all the farmers in the eastern part of Daund taluka for sugarcane cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.