घराघरात गौरीच्या आगमनाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:00+5:302021-09-12T04:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाडक्या बाप्पांचे शुक्रवारी उत्साहात आगमन झाले असून, रविवार (दि. १२) रोजी गौरींचे घरोघरी आगमन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाडक्या बाप्पांचे शुक्रवारी उत्साहात आगमन झाले असून, रविवार (दि. १२) रोजी गौरींचे घरोघरी आगमन होणार आहे. गौरींचे मुखवटे, साड्या, दागदागिने, सजावटीचे साहित्य यांनी बाजारपेठ सजली असून, वैविध्यपूर्ण साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात लगबग वाढली आहे. दरम्यान, गौरींचे आगमन झाल्यानंतर सोमवार (दि.13) ला घरोघरी पारंपरिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात येईल. माहेरवाशीण गौराईच्या स्वागतासाठी व पूजेत काही कमी पडू नये यासाठी महिलांची धडपड सुरू आहे. त्यानंतर मंगळवार (दि.14) गौरी- गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
रविवारी घरांमध्ये ज्येष्ठा गौरी विराजमान होणार असून, प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे गौरींचे पूजन केले जाणार आहे. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची रीत आहे. तर काही गौरी मुखवट्याने सजतात. तर काही ठिकाणी प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे गौरी आगमनाची प्रथा आहे. यासाठी महिला तयारी लागल्या असून, साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग दिसून आली. गौरींचे मुखवटे, मुकुट, हार, दागिने, साडी, सजावटीच्या साहित्यांसह पूजेच्या साहित्यांची खरेदीही महिलांनी केली. मुखवटे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी तुळशीबागेत, तर भाज्यांसाठीच्या खरेदीसाठी मंडईत लगबग दिसली. तर लक्ष्मी रस्त्यावर साड्यांच्या खरेदीसाठी महिलांनी दालनांमध्ये गर्दी केली. यंदा गौरी आगमनाच्या निमित्ताने घरोघरी हळदी-कुंकूवाचे कार्यक्रमही होणार असून, त्यासाठीची खरेदीही महिलांनी केली. गौरी आगमनाचे निमित्त महिलांसाठी खास असते. हा दिवस त्या आनंदाने, उत्साहाने साजरे करतात. म्हणूनच यंदाही हा आनंद आणि उत्साह दिसून येत आहे.
-----------------
असा आहे गौरी पूजेचा मुहूर्त
बाप्पाच्या आगमनानंतर रविवारी गौरीचे आगमन होत आहे. रविवारी (दि.12) सकाळी 9 वाजून 50 मिनिटानंतर गौरी आवाहन करता येईल. सोमवारी (दि.13) गौरी पूजन आणि भोजनाचा दिवस आहे. घरातील प्रथा आणि परंपरेप्रमाणे गौरी पूजन करावे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. मंगळवारी (दि.14) सकाळी 7 वाजून 5 मिनिटानंतर गौरी विसर्जन करता येईल. मंगळवार असला तरीही गौरी विसर्जन परंपरेप्रमाणेच करावे, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी कळविली आहे.
---
12 सप्टेंबर(रविवार) - सकाळी ९ वाजून ५० मिनिटानंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
13 सप्टेंबर (सोमवार) - गौरी पूजन
14 सप्टेंबर (मंगळवार) - सकाळी 7 वाजून 5 मिनिटानंतर गौरी विसर्जन करावे.
-------