Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:30 PM2022-01-03T13:30:53+5:302022-01-03T13:31:02+5:30
सद्यस्थितीत दोन्ही प्रकारच्या विषाणूमध्ये अनेक रुग्ण लक्षणेविरहित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे
पुणे : राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या नव्या विषाणूची एंट्री झाल्यावर कोरोना रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ दिसत आहे. पुण्यातही काल कोरोनासहित ओमायक्रॉन रुग्णवाढीचा उद्रेक पाहायला मिळाला. परंतु सद्यस्थितीत दोन्ही प्रकारच्या विषाणूमध्ये अनेक रुग्ण लक्षणेविरहित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. कोरोनासह ओमायक्रॉन जरी वाढत असला तरी पुणेकरांनी सध्याचे चित्र पाहता घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पण काळजी घेणे गरजेचे असल्याचे महापालिका आवाहन करत आहे.
पुणे महापालिकेने कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. शहरात गेल्या आठ दिवसांत एक - दोन अपवाद वगळता दररोज ६ ते ७ हजारांपर्यंत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे आठ दिवसांत ४९ हजार ५०५ चाचण्या केल्या असून, त्यात २२४८ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०० रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोजच्या मोठ्या रुग्णवाढीमुळे सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारांवर गेली आहे. गेल्या रविवारी (दि.२६) ९८१ इतकीच होती. आठ दिवसांत यामध्ये दीड हजाराने वाढ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर, तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण पुण्याबाहेरील आहे. आतापर्यंत ३८ लाख ७९ हजार ४८७ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी पाच लाख ११ हजार १४१ जण बाधित आढळून आले आहेत. यातील चार लाख ९९ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ९ हजार ११८ जण दगावले आहेत.
राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात काल ३६, पिंपरी चिंचवडमध्ये ८ तर पुणे ग्रामीणमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. आजवर राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे शहरात ४९, पिंपरी चिंचवडमध्ये ३६ आणि पुणे ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आढळून आले आहेत. ५१० पैकी यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
महापालिकेने वाढवली चाचण्यांची संख्या
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग जास्त आहे. परंतु, लक्षणेविरहित असल्याने काेणत्याही प्रकारे अनावश्यक भीती न बाळगता रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. शहरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार ५१४ झाली आहे. २६ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान शहरात ४९,५०५ चाचण्या झाल्या. यापैकी २२४८ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. आठ दिवसांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.