शिक्षणाबरोबरच निवासी डॉक्टरांवर कोविड ड्युटीचाही ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:39+5:302021-04-02T04:10:39+5:30
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना परिस्थितीचा पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. यामुळे ...
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना परिस्थितीचा पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. यामुळे संपूर्ण वैद्यकीय कौशल्य आत्मसात नसलेली डॉक्टर्सची पिढी घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात जादा वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी मार्ड संघटनेतर्फे रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात ४५०-५०० निवासी डॉक्टर आहेत. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत येतात. वैद्यकीय शिक्षण हा संचालनालयाचा मूळ उद्देश आहे. रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे काम आहे. तरीही, सध्याची परिस्थिती पाहून निवासी डॉक्टर कोविड ड्युटी निभावत आहेत. ही परिस्थिती अनिश्चित काळासाठी कायम राहणार आहे. अशा वेळी शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी वार्षिक शैक्षणिक वेळापत्रकात, प्रात्यक्षिकात, प्रशिक्षणात कोणतीही काटछाट करू नये, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
मार्ड संघटनेचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, ‘‘निवासी डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण, अनुभव न मिळाल्यास संपूर्ण कौशल्य आत्मसात केलेले डॉक्टर लाभणार नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेला नुकसान पोहोचू शकते. कोविड ड्युटी करताना आजवर १०० हुन अधिक निवासी डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.’’
कोरोना व्यवस्थापनाबरोबरच येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्यासाठी विशेषज्ञ घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, याची जाणीव वैद्यकीय महाविद्यालयांना ठेवावी लागणार आहे. अन्यथा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भावना निवासी डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. एमडी/एमएसच्या उमेदवारांना प्रबंधही सादर करावा लागतो. त्यासाठी त्यांना लॉकडाऊनमुळे पुरेसा सॅम्पल साईजही अभ्यासता आला नाही. कोरोनामुळे इतर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना पुरेशा केसेस अभ्यासता आलेल्या नाहीत.
-----
मार्ड संघटनेच्या मागण्या :
१) पोस्ट पीजी ज्युनियरच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात
२) पुणे महापालिकेने महापालिकांप्रमाणे जास्तीत जास्त जबाबदारी उचलावी
३) तंत्रज्ञ, क्लर्क यासाठी जागांवर भरती करावी
४) निवासी डॉक्टरांसदर्भात महत्वाचे निर्णय घेताना मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे