आरक्षण सोडतीसोबतच फेररचनाही कळणार

By Admin | Published: October 5, 2016 01:45 AM2016-10-05T01:45:10+5:302016-10-05T01:45:10+5:30

जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना अधिकृतरित्या १० आॅक्टोबर रोजी जाहीर होणार असली, तरी आरक्षण सोडत काढताना प्रशासनाला प्रत्येक गट-गणाचा नकाशा प्रसिद्ध करावा लागेल

Along with the reservation, we will also know the reconstruction | आरक्षण सोडतीसोबतच फेररचनाही कळणार

आरक्षण सोडतीसोबतच फेररचनाही कळणार

googlenewsNext

सुषमा नेहरकर-शिंदे , पुणे
जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना अधिकृतरित्या १० आॅक्टोबर रोजी जाहीर होणार असली, तरी आरक्षण सोडत काढताना प्रशासनाला प्रत्येक गट-गणाचा नकाशा प्रसिद्ध करावा लागेल. त्यामुळे सोडतीसोबतच बुधवारीच (दि. ५) इच्छुकांना फेररचनादेखील कळणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये कोणाचे गट-गण जाणार व कोणाचे राजकीय भवितव्य टांगणीला लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणांची आरक्षण सोडत बुधवारी एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये काढण्यात येईल. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७५ गटांची आरक्षण सोडत दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. गटांचे आरक्षण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार निवडणुका होत असल्याने गट-गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात गट-गणांची फेररचना नक्की कशी झाली, हे प्रथम कळणे अपेक्षित होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अगोदर आरक्षण सोडत अन् नंतर फेररचना जाहीर करण्यात येणार आहे.
गट-गणांची आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार असून, त्यासाठी सन २००२, २००७ आणि २०१२चे आरक्षण गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे मागील ३ निवडणुकांत टाकण्यात आलेली आरक्षणे वगळून गट-गणांवर आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, या वेळी गट-गणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
सन २०११च्या लोकसंख्येनुसार जुन्नर, भोर, दौंड आणि बारामती या तालुक्यांत प्रत्येकी एक गट कमी झाला आहे. तर, एकट्या हवेली तालुक्यात तब्बल तीन गटांची व शिरूर तालुक्यात एका गटाची नव्याने निर्मिती झाली आहे.
नव्याने निर्माण झालेल्या गट-गणांमध्ये पूर्वीच्या गट-गणांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याने जुने आरक्षण गृहीत धरून चक्राकार आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, एखाद्या गट-गणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या नव्याने आली असल्यास येथे फ्रेश (प्रथमच) आरक्षण टाकण्यात येणार आहे. ही आरक्षणे जाहीर करीत असताना प्रत्येक गट-गणाची माहिती व नकाशा जाहीर करण्यात येईल.

Web Title: Along with the reservation, we will also know the reconstruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.