जिवंत माणसांबरोबरच कळते ‘मृतदेहांची भाषा’! हजारांपेक्षा अधिक पाेस्टमाॅर्टम करणारी महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:05 PM2022-09-30T13:05:44+5:302022-09-30T13:06:32+5:30
''मी अनेक मृतदेहांची उकल करून नातेवाइकांना न्याय देऊ शकले याचे समाधान वाटते''
ज्ञानेश्वर भोंडे
पुणे: जिवंत रुग्णांच्या वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणाऱ्या विविध वैद्यकीय शाखेच्या महिला डाॅक्टर आपण पाहताे. मात्र ससून रुग्णालयातील डॉ. अश्विनी भोसले या महिला डाॅक्टर इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. कारण त्यांना माणसांचीच नव्हे तर मृतदेहांचीही भाषा कळते. वाघाचे काळीज असलेल्या या नवदुर्गेने वेगळी शाखा निवडत पुरुषांचा प्रांत असलेल्या ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात पोस्टमॉर्टम करण्याला प्राधान्य दिले. आतापर्यंत त्यांनी हजारांपेक्षा अधिक पाेस्टमाॅर्टम केले आहेत.
मृतदेह निर्जीव असला तरी त्याच्या शरीरावर व अंतर्गत झालेले वार, जखमांच्या माध्यमांतून ताे बाेलत असताे. फक्त ती भाषा न्यायवैद्यक शास्त्रातील डाॅक्टरांना कळते, त्यापैकी एक आहेत डाॅ. अश्विनी. लहानपणी मालिकांमधून न्यायवैद्यक तज्ज्ञांचे काैशल्याचे काम पाहून मूळच्या पुणेकर असलेल्या अश्विनी भोसले यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ होण्याचा निर्धार पक्का केला. धुळ्यात एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससूनच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात (फॉरेन्सिक मेडिसिन) प्रथमच महिला म्हणून पदव्युत्तर पदवी घेत दाेन वर्षापूर्वी थेट कामाला सुरुवात केली.
मुळातच धाडसी असलेल्या अश्विनी यांनी आतापर्यंत सहकारी डाॅ. मीनाक्षी मल्हाेत्रा यांच्यासाेबत खून, बलात्कार, अपघात, जळीत अशा हजाराे मृतदेहांचे पाेस्टमाॅर्टम केले. यामध्ये मृतदेहाची कवटीसह छाती, पाेट फोडून अंतर्गत अवयवांचे बदल तपासणे, जखमांचे अवलाेकन करून त्यावरून हा मृत्यू नैसर्गिक आहे का, त्याचा घातपात झालाय की, विषबाधा झाली याचा निष्कर्ष लावण्याची जबाबदारी पार पाडली. याबराेबरच मृत्यूचे अहवाल तयार करणे, बलात्कारांच्या केसेसचे अवलाेकन, हाडांच्या वाढीवरून वय ठरवणे आदी कामेही असतात, अशी माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. नरेश झंझाड यानी दिली.
...तेव्हा त्यांचे वाघाचे काळीजही पाझरले
हजाराे पाेस्टमाॅर्टम करताना डाॅ. आश्विनी कधीच डगमगल्या नाहीत. पण जेव्हा एका तीन वर्षाच्या लहान चिमुकलीचा बलात्कार झालेला मृतदेह, सात वर्षाच्या मुलाचा खून झालेला मृतदेह आणि काेराेना काळात कात्रज येथे जाेडप्याने पाेटच्या चिमुकल्यांना मारून स्वत: गळफास घेतलेले मृतदेह समाेर पाहून त्यांचे वाघाचे काळीजही पाझरले हाेते.
मी अनेक मृतदेहांची उकल करून नातेवाइकांना न्याय देऊ शकले
सर्वसामान्यांच्या दृष्टिकाेनातून न्यायवैद्यक विभाग म्हणजेच डेड हाउस व चिरफाड करतात. तसेच मृतदेहातून अवयवय काढतात व ताे विकृत करतात अशी चुकीची धारणा समाजात आहे. एखादा नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या वाटत असलेल्या मृतदेहाचाही खून झालेला असू शकताे. अनेक वेळा पाेस्ट माॅर्टेम करताना वरून जखम दिसत नसली तरी आतून ती दिसते. अशा प्रकारे आतापर्यंत मी अनेक मृतदेहांची उकल करून नातेवाइकांना न्याय देऊ शकले याचे समाधान वाटते. - डाॅ. अश्विनी भाेसले, ज्युनिअर रेसिडेंट, ससून न्यायवैद्यकशास्त्र विभाग