पक्षांच्या उमेदवारांबरोबर ड्रायव्हरचीही धावपळ सुरु; सकाळपासून रात्री उशिरापर्यंत १८-१८ तास ड्यूटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:34 AM2024-04-29T11:34:55+5:302024-04-29T11:35:23+5:30
पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा पायाला भिंगरी लावून प्रचार सुरु, त्यांच्याबरोबर ड्रायव्हरलाही करावी लागते तारेवरची कसरत
पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांबरोबर त्यांच्या ड्रायव्हरचीही धावपळ सुरू आहे. सकाळी लवकर सुरू झालेला उमेदवारांचा प्रचार रात्री उशिरापर्यत सुरू असतो. त्यामुळे ड्रायव्हरला १८-१८ तास ड्यूटी करावी लागत आहे. त्यामुळे उमेदवारांचे ड्रायव्हर १८ तास बिझी आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात उभे आहेत. या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २९ एप्रिलला आहे. त्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघातील उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. त्यांच्याबरोबर उमेदवारांच्या ड्रायव्हरलाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सकाळी लवकर घरातून बाहेर पडतो. रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू असतो. त्यामुळे मॉर्निंग वॉक बंद आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या घरून जेवणाचा डबा येतो. त्यामुळे जेवण मात्र वेळेवर होते. सध्या मॉर्निंग वॉक बंद आहे. - वरद गाडगीळ (मुरलीधर मोहोळ यांचे ड्रायव्हर)
सकाळी सात वाजता दिवस सुरू होतो. रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू असतो. घरी जाण्यास रात्री दोन वाजत आहेत. जेवण वेळेवर होत नाही. व्यायामही बंद आहे. - योगेश चव्हाण (रवींद्र धंगेकर यांचे ड्रायव्हर)