पुणेकरांना पडू लागली चहाबरोबरच कॉफीचीही भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:53 AM2022-12-21T08:53:46+5:302022-12-21T08:54:49+5:30
रस्तोरस्ती कॉफी बार सुरू झाले असून, त्यावरची गर्दीही वाढत आहे...
- मानसी जोशी
पुणे : चहा आणि पुणेकरांचे नाते अतूट आहे. त्यामुळेच चहाला अमृततूल्य म्हणणारे पुणेच एकमेव. पण, पुणेकरांच्या या चहाप्रेमाला आता ओहोटी लागली आहे. रस्तोरस्ती कॉफी बार सुरू झाले असून, त्यावरची गर्दीही वाढत आहे. त्या तुलनेत अमृततूल्य मात्र ओस होत आहेत.
कधीतरी एखाद्याच रम्य संध्याकाळी घ्यावी अशी एकेकाळी कॉफीची क्रेझ होती. कॉफी घेणे म्हणजे फार वेगळे आणि मोठेपणाचे समजले जात होते. आता कॉफी सर्वमान्य झाली आहे. कॉफी पिण्याला एक वेगळीच प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी, त्यातही गर्दीच्या रस्त्यांवर स्ट्रीट कॉफी बार सुरू होत आहेत. यात स्ट्रीट कॉफी ही एक पर्वणीच आहे.
परवडणारे अन् नाविन्यपूर्ण
स्ट्रीट कॉफी फक्त कॉफीपुरतीच मर्यादित नाही. कॉफीशिवाय खिशाला परवडतील अशी वेगवेगळी पेयेही या स्ट्रीट कॉफी बारमध्ये मिळतात. एक्सप्रेसो, कॅपुचिनो, कॅफे मोचा, व्हाइट फॅन्टसी, ब्लू लगून, व्हर्जिन मोईतो, मँगो स्मुदी असे एक ना असंख्य प्रकार. ते देण्यातही सतरा प्रकार. ग्लास वेगळे, त्यांचे आकार वेगळे, कॉफीवर चॉकलेटने केलेले डिझाईन वेगळे. अनेकदा तर त्यावर सुरेख असे फोटोही. कॉफीचा मग थोडा हलवला की, लगेच चित्रही हलते.
दिवसाही राेषणाई
शहरातील कोणत्याही रस्त्यावरून चक्कर मारली की, रस्त्याच्या एका कडेला हे सजवलेले स्ट्रीट कॉफी बार दिसतातच. तरुण - तरुणींनी ते घेरलेले असतात. माणिकबाग, फर्ग्युसन कॉलेज रोड, विमाननगर, बालेवाडी हाय स्ट्रीट, कोरेगाव पार्क, कर्वे नगर, प्रभात रोड, अशा रस्त्यांवर दिवसाही विद्युत रोषणाईंनी झळाळणाऱ्या या स्ट्रीट कॉफी बारमधील दरही तरुणाईला परवडणारेच आहेत. ९० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत कॉफी आणि विविध प्रकारचे ड्रिंक्स मिळतात.
शहरातील चित्र :
- रस्त्यावरून चालत जाताना हातातील मोठ्या ग्लासमधून स्ट्रॉच्या साह्याने घोटघोट घेत चाललेली मुले-मुली याच स्ट्रीट कॉफीबारमधून बाहेर पडलेली दिसतात. त्याशिवाय स्टॉलभोवतीही तरुणांचा घोळका असतो. सायंकाळी तर हे सगळे स्टॉल भलतेच फुललेले असतात. रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.
- एकेकाळी पुण्याची ओळख असलेली अमृततूल्य, आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच शिल्लक राहिली. जी सुरू आहेत त्यातही फारशी गर्दी दिसत नाही. क्रिमरोल, समोसे, शीतपेये विक्रीला ठेवून ती कशीबशी तग धरून उभी आहेत. वेगवेगळ्या नावांनी सुरू झालेल्या कॉर्पोरेट लूक असलेल्या ब्रँड नेम चहाची दुकाने आहेत, पण तिथेही फारशी गर्दी दिसत नाही.
परदेशात स्ट्रीट कॉफीचे वेड जास्त आहे. मी परदेशात होतो. ते पहायचो त्यावेळी विचार केला की, स्ट्रीट कॉफी पुण्यात सुरू करावी. तो प्रत्यक्षात आणला व पुणेकरांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसाला १२,००० ते १५,००० उत्पन्न होते.
- शिव किरण कडू (स्ट्रीट कॉफी चालक)
पॉकेट फ्रेंडलीमुळे स्ट्रीट कॉफीला प्राधान्य मिळते. वेळेची मर्यादा न बाळगता मित्र - मैत्रिणींसोबत चांगला टाईमपास करता येतो. कॉफीचे देशी आणि परदेशी प्रकार इथे आम्हाला मिळतात. चवदेखील तेवढीच छान असते.
- दिव्या घोडके (तरुणी)