कुराणबरोबरच ते अभंगही गायचे अन् कीर्तनात रममाण व्हायचे; वैश्विक मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण 

By राजू इनामदार | Published: June 28, 2024 09:33 AM2024-06-28T09:33:53+5:302024-06-28T09:34:07+5:30

गुलाबभाई तांबोळी :  वैश्विक मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण 

Along with the Quran, he used to sing Abhang and rejoiced in Kirtan | कुराणबरोबरच ते अभंगही गायचे अन् कीर्तनात रममाण व्हायचे; वैश्विक मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण 

कुराणबरोबरच ते अभंगही गायचे अन् कीर्तनात रममाण व्हायचे; वैश्विक मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण 

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : मंडईतील लसणाचे प्रसिद्ध व्यापारी. नाव गुलाबभाई तांबोळी. पाच वेळा नमाज पढणारे नमाजी; पण कुराणबरोबरच ते अभंगही गायचे, कीर्तनही करायचे. वीणा वाजवायचे. एखाद्या वारकऱ्याला क्वचितच मिळणारा पंढरीच्या विठ्ठल मंदिरात गरूड खांबासमोर भजने गायचा मान त्यांना मिळत होता. 
आजही गुलाबभाई तांबोळी यांचे नाव मंडईत मोठ्या आदराने घेतले जाते. अखिल मंडई मंडळाच्या हरिहर भजनी मंडळाचे ते सदस्य. मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत ते लहानपणापासून रमत. 

ऐकून-ऐकून त्यांना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यासह इतर संतांच्या रचनाही तोंडपाठ झाल्या. मंडळाच्या सदस्यांसमवेत ते विठ्ठलभक्तीमध्ये इतके रमले की मंडळाने त्यांना विठ्ठल मंदिरात वीणेकऱ्याचा मान दिला. गुलाबभाईंबरोबर मंडळात असलेले माऊली टाकळकर आज ९८ वर्षांचे आहेत. ते टाळकरी आहेत. या वयातही कीर्तनाला साथसंगत करतात. त्यांनी सांगितले की, गुलाबभाई  गोरेपान व उंच होते. त्यांचा गळाही सुरेख होता. त्यात ते पेटी वाजवत आणि वाजवतानाच अभंग म्हणत. 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड : गुलाबभाईंचे लग्न झाले. पत्नी मिळाली पंढरपूरची. त्यामुळे तर त्यांची कीर्ती थेट पंढरपुरात पोहोचली. तिथेही त्यांनी आपल्या सुरेख भजनगायनाने वारकरी मंडळींना आपलेसे केले. विठ्ठल मंदिरातील गरूड खांबासमोर कीर्तन करण्याचा मान त्यांना मिळाला होता.

अंतिम निरोपालाही भजनाची साथ
१९७५ मध्ये गुलाबभाईंचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव दफनासाठी नेताना त्यांच्या घरापासून ते अखिल मंडई मंडळाच्या मंदिरापर्यंत पुढे हरिहर भजनी मंडळाचा ताफा होता.  विशेष म्हणजे मंडळाच्या या मागणीला तत्कालीन मौलवींनी कोणतीही हरकत घेतली नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार गुलाबभाई यांचा १४ वा भजनकीर्तनाने व वारकऱ्यांना भोजन देऊन करण्यात आला. - उल्हास पवार, माजी आमदार, संत साहित्याचे अभ्यासक

Web Title: Along with the Quran, he used to sing Abhang and rejoiced in Kirtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे