Alphonso Mango: आंब्याचा गोडवा वाढणार; अक्षयतृतीयेला मोठी आवक, दर कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 03:33 PM2022-04-26T15:33:29+5:302022-04-26T15:33:38+5:30
पुणे : मार्केट यार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक आंब्याची रविवारी मोठ्या प्रमाणात आवक झाली. दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रत्नागिरी तसेच ...
पुणे : मार्केट यार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक आंब्याची रविवारी मोठ्या प्रमाणात आवक झाली. दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रत्नागिरी तसेच कर्नाटक हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. रविवारपासून आवक वाढल्याने कोकणच्या राजाच्या कच्च्या आंब्याचे दर एका डझनामागे ८०० रुपयांनी उतरले आहेत.
आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी रत्नागिरी हापूसच्या कच्च्या आंब्याच्या दरात एका डझनामागे १५०० पर्यंत दर उतरल्याचे सांगितले. हंगाम सुरू झाल्यापासून प्रथमच रविवारी मोठी आवक झाली आहे. अक्षयतृतीयेला मोठी आवक होणार असल्याने त्यानंतर सामान्यांच्या आवाक्यात आंब्याचे दर येतील, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखविली.
आवक वाढल्याने रत्नागिरीच्या हापूसच्या कच्च्या आंब्याच्या डझनामागे ५०० ते ८०० रुपयांनी गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी हापूस आंब्याची मार्केट यार्डात रविवारी १० ते १२ हजार पेटींची आवक झाली आहे, असे आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.
कर्नाटक आंब्याचे व्यापारी अमित उरसळ म्हणाले, ‘हापूसची दोन डझनाच्या १० ते १२ हजार बॉक्सची तसेच दोन हजार लाकडी पेट्यांची आवक झाली आहे. लालबाग, बदाम, हापूस, पायरी या प्रकारच्या पाचशे ते एक हजार क्रेटसची कर्नाटक हापूस आंब्याची आवक झाली आहे. चार ते पाच डझनाच्या पेटीमागे ५०० रुपये दर उतरले आहे. रमजान ईद, अक्षयतृतीयेनंतर आंब्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आंब्याचे दर
१) रत्नागिरी हापूसचे दर
* कच्चा हापूस (४ ते ६ डझन) - २५०० ते ३००० तसेच (५ ते १० डझन) ३५०० ते ४०००
* तयार हापूस (४ ते ६ डझन) ३००० ते ४५०० तसेच (५ ते १० डझन) ४५०० ते ७०००
२) कर्नाटक हापूसचे दर
* दोन डझन (कच्चा) ५०० ते १००० तसेच दोन डझन (तयार) १५०० ते १८००
* लालबाग (एक किलो- कच्चा) ५० ते ६० तसेच (तयार) ८० ते १००
* बदाम (एक किलो कच्चा) ४० ते ७० तसेच (एक किलो तयार) ७० ते १००